

कोल्हापूर : महापालिकेतील 85 लाख रुपयांच्या ड्रेनेज घोटाळ्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावलेल्या अधिकार्यांनी आपापले लेखी खुलासे सादर केले आहेत. मात्र, हे खुलासे म्हणजे जबाबदारी नाकारण्याची चढाओढच झाली आहे. कोणी सह्या झटकल्या, तर कोणी कामच माझ्याकडे नव्हते, असा दावा केला. विशेष म्हणजे एका कनिष्ठ अभियंत्यांनी तर ‘ठेकेदाराने माझ्या कपाटातून एमबी चोरी केली’, असे खुलासापत्रात म्हटले.
प्रशासक मंजुलक्ष्मी यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर व शहर अभियंता रमेश मस्कर यांच्याकडे पाठवलेले खुलासे पाहता पुढील बाबी उघड झाल्या.
1) कनिष्ठ अभियंता प्रज्ञा गायकवाड : ‘एमबी माझ्या कपाटातून ठेकेदाराने चोरली.’
2) शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत व उपशहर अभियंता रमेश कांबळे : ‘या कामावर आमच्या सह्या नाहीत.’
3) वर्षा परीट, लेखापरीक्षक : ‘माझ्याकडे विभागीय कार्यालय क्र. 1 व 2 होते, हे काम कार्यालय क्र. 4 चे होते. माझी नोटीस चूक आहे.’
इतर अधिकारी ः मुख्यलेखापाल संजय सरनाईक, तत्कालीन वरिष्ठ लेखापरीक्षक सुनील चव्हाण, वरिष्ठ लिपिक जयश्री हंकारे, सेवानिवृत्त कनिष्ठ लिपिक प्रभाकर नाईक, अकाऊंटंट बळवंत सूर्यवंशी यांनीही आमच्याकडे रितसर काम आले ते पाहून आम्ही नियमाप्रमाणे सह्या केल्या, असे स्पष्टीकरणात म्हटले आहे.
या संपूर्ण प्रकरणात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कामाचा रेकॉर्ड ऑनलाईन सिस्टीमवर ‘की’च्या माध्यमातून लॉक केला जातो. मात्र, ही ऑनलाईन की नेमकी कोणाच्या ताब्यात होती, यावर मात्र कोणताही अधिकारी स्पष्ट उत्तर देत नाही, हे विशेष उल्लेखनीय!