

कोल्हापूर : राज्यात महापालिका, नगरपालिका, नगर पंचायती, तसेच जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका टप्प्याटप्प्यानेच होण्याची शक्यता आहे. या निवडणुका एकाच वेळी अथवा काही अंतराने घ्यायच्या म्हटल्या, तरी त्यासाठी आवश्यक अधिकारी आणि मनुष्यबळाची वानवा आहे. जिल्ह्यातील निवडणूक कामांसाठी आवश्यक अधिकारी, कर्मचार्यांची राज्य निवडणूक आयोगाने माहिती मागवली आहे. त्यात ही बाब समोर आली आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार, राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. महापालिका, नगरपालिका, नगर पंचायत आणि जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी प्रभाग रचनेची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रत्येक जिल्ह्याकडे असलेल्या ईव्हीएमची पडताळणी पूर्ण होत आली आहे. आता निवडणूक कामासाठी आवश्यक अधिकारी, कर्मचार्यांबाबत राज्य निवडणूक आयोगाने माहिती मागवली आहे.
या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकार्यांची नियुक्ती केली जाते, तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एक तहसीलदार आणि दुसरा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अन्य विभागांतील तालुकाप्रमुख अधिकार्यांची नियुक्ती करता येते. जिल्हा परिषदेसाठी एका तालुक्याला एक उपजिल्हाधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून, तर दोन सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्त करावे लागतात. नगरपालिकेसाठी एक उपजिल्हाधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी आणि दोन सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, तर महापालिकेसाठी 15 ते 20 प्रभागांसाठी एक उपजिल्हाधिकारी निवडणूक आणि दोन सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नेमावे लागतात. यामुळे सध्या तरी टप्प्याटप्प्यानेच निवडणुका होतील, असे चित्र असल्याचे सांगण्यात येते.
एक निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किमान दोन महिन्यांचा कालावधी लागतो. या सर्व निवडणुका टप्प्याटप्प्याने होणार असतील, तर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सहा ते आठ महिने सुरू राहण्याचीही शक्यता जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.
निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करा, चार महिन्यांत निवडणुका घ्या, असे आदेश दिले होते; मात्र उपलब्ध परिस्थितीनुसार टप्प्याटप्प्याने निवडणुका झाल्या, तर महापालिका निवडणुका होण्यास पुढील वर्ष उजाडेल, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यात एकूण उपजिल्हाधिकारी : 14
निवडणूक कामासाठी उपलब्ध होऊ शकणारे : 12
जिल्ह्यातील एकूण तहसीलदार : 18
निवडणूक कामासाठी उपलब्ध होऊ शकणारे : 18
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आवश्यक उपजिल्हाधिकारी : 12
जि. प. निवडणुकीसाठी आवश्यक तहसीलदार : 12
नगरपालिका, नगर पंचायतींसाठी आवश्यक उपजिल्हाधिकारी : 13
नगरपालिका, नगर पंचायतींसाठी आवश्यक तहसीलदार : 13
कोल्हापूर महापालिकेसाठी आवश्यक उपजिल्हाधिकारी : किमान 4, कमाल 6
इचलकरंजी महापालिकेसाठी आवश्यक उपजिल्हाधिकारी : किमान 3, कमाल 4
एकाच वेळी सर्व निवडणुका झाल्यास आवश्यक उपजिल्हाधिकारी : 32
एकाच वेळी सर्व निवडणुका झाल्यास उपलब्ध उपजिल्हाधिकारी : 12