Municipal Elections | नाराज इच्छुक उमेदवारांवर प्रतिस्पर्धी पक्षांची नजर!

उमेदवारीसाठी धावपळ : नेते, इच्छुकांची कोंडी; महायुती-महाआघाडीत नाराजांचा स्फोट होण्याची चिन्हे
Kolhapur Municipal Corporation elections
Municipal Elections | नाराज इच्छुक उमेदवारांवर प्रतिस्पर्धी पक्षांची नजर!Pudhari File Photo
Published on
Updated on

डॅनियल काळे

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, येनकेनप्रकारे उमेदवारी मिळवून निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी इच्छुक उमेदवारांकडून सुरू आहे. मात्र, उमेदवारीबाबतची अनिश्चितता वाढत चालल्याने अनेक इच्छुक उमेदवार व त्यांच्या कुटुंबीयांची अक्षरशः झोप उडाली आहे. परिणामी, महायुती व महाआघाडी या दोन्ही तुल्यबळ आघाड्यांमध्ये नाराज इच्छुक उमेदवारांची संख्या वाढताना दिसत असून, त्यांच्यावर प्रतिस्पर्धी पक्षांचे लक्ष केंद्रित झाले आहे.

नाराज इच्छुकांना आपल्या आघाडीत घेऊन थेट उमेदवारी देणे किंवा त्यांचा वापर प्रतिस्पर्धी आघाडीविरोधात करणे, अशा दुहेरी रणनीतीवर सध्या राजकीय पक्ष विचार करत आहेत. त्यामुळे उमेदवारीचा तिढा अधिकच गुंतागुंतीचा बनत चालला आहे. महापालिका निवडणूक प्रक्रिया आता टप्प्याटप्प्याने पुढे सरकत असून, अवघ्या चार दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी इच्छुकांच्या मुलाखती घेण्याची औपचारिकता पूर्ण केली असून, एक-दोन दिवसांत उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी नेत्यांच्या कार्यालयात ठिय्या मांडला आहे. वारंवार भेटीगाठी घेत, ‘मी पक्षासाठी 25 वर्षे निष्ठेने काम केले आहे; पण उमेदवारीच्या वेळी नेहमीच डावलले जाते. यावेळी तरी न्याय द्या,’ अशी थेट भावना नेत्यांसमोर व्यक्त केली जात आहे. काहीही करून नेत्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न जोरात सुरू आहेत.

उमेदवारी लवकर निश्चित झाली, तर प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळेल, या अपेक्षेने कार्यकर्ते ‘आता तरी उमेदवारी जाहीर करा, म्हणजे आम्ही अधिक ताकदीने कामाला लागू,’ असा आग्रह धरत आहेत; मात्र नेतेमंडळींकडून, ‘थांबा, उगाच नाराजी ओढवून घेऊ नका,’ असा सबुरीचा सल्ला दिला जात आहे. एखादा ताकदीचा उमेदवार डावलला गेला आणि तो दुसर्‍या पक्षात गेला, तर मोठा राजकीय धोका निर्माण होऊ शकतो. ही जोखीम स्वीकारण्यास नेते तयार नाहीत, तर शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी प्रलंबित राहिल्यास निवडणुकीच्या तयारीवरही पाणी फिरण्याची भीती इच्छुक उमेदवारांना सतावत आहे. यामुळे नेते आणि इच्छुक उमेदवार यांची अवस्था ‘धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय’ अशी झाली आहे. महायुती असो वा महाआघाडी दोन्ही आघाड्यांत सध्या असेच अस्वस्थ वातावरण पाहायला मिळत आहे.

नेत्यांवर वाढतोय दबाव

उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांकडून नेत्यांच्या जवळच्या व्यक्तींना गाठण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मध्यस्थांमार्फत नेत्यांच्या मनातील भूमिका समजून घेण्याचा प्रयत्न केला जात असून, रोज अशा मध्यस्थांची नेत्यांकडे रांग लागलेली आहे. परिणामी, उमेदवारी वाटपाच्या निर्णयावरून नेत्यांचीही मोठी कोंडी झाली असून, राजकीय दबाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news