

कोल्हापूर : जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणूक निकालांचे चित्र स्पष्ट होताच विजयाचा जल्लोष केवळ मतमोजणी केंद्रांपुरता मर्यादित राहिला नाही, तर तो सोशल मीडियावरही तुफान व्हायरल झाला. नेत्यांनी एकमेकांना मारलेली मिठी, निकालनंतरच्या टोलेबाजीचे शॉर्ट व्हिडीओ आणि शड्डू, नाद करती काय, वन साईड सिकंदर, किंगमेकर, करेक्ट कार्यक्रम, इतिहास घडविला भगवा फडकवला, सुवर्ण विजय अशा हजारो पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्या. प्रत्येकाच्या व्हॉटस्अॅप, फेसबुक, इन्स्टाग्रामच्या स्टेटस्वर या पोस्ट आणि विजयाचा गुलाल दिसत होता.
जिल्ह्यातील 10 नगरपालिका आणि 3 नगरपंचायतींच्या निकालांची प्रक्रिया सुरू होताच जसा जल्लोष मतदान केंद्रांवर दिसत होता, तसाच उत्साह डिजिटल विश्वातही जाणवत होता. नेत्यांच्या प्रतिक्रिया, कार्यकर्त्यांचे स्टेटस्, विजयाचा गुलाल उधळतानाचे फोटो-व्हिडीओ क्षणातच हजारोंच्या संख्येने शेअर होत होते. व्हॉटस्अॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्सपोस्टवर निकालानंतर नेत्यांनी दिलेल्या भन्नाट प्रतिक्रिया, कार्यकर्त्यांचे स्टेटस् तुफान व्हायरल होत होते.
वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ व समरजित घाटगे यांनी मारलेली मिठी. ‘मैत्रीची गाठ पुन्हा बांधता येईल’ सतेज पाटील यांनी लगावलेल्या या टोल्याचे शॉर्ट व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत होते. नेत्यांनी केलेल्या टोलेबाजीचे शॉर्ट व्हिडीओ अनेकांनी स्टेटस्ला देखील लावले होते.
नाद करायचा नाय, वन साईड सिकंदर, किंगमेकर, करेक्ट कार्यक्रम
नेत्यांचे फोटो, विजयाचा गुलाल लावतानाचा जल्लोष, शड्डू ठोकत केलेला विजयोत्सवासोबत नाद करायचा नाय, वन साईड सिकंदर, किंगमेकर, करेक्ट कार्यक्रम केला, असे मेसेज, त्यासोबत फोटो, व्हिडीओ आणि बॅकग्राऊंडला लावलेले डॉन हे गाणे सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत होते. एकूणच निकालानंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरण जितके प्रत्यक्षात उत्साही होते, तितकेच सोशल मीडियावरही दिसून आले. निकालानंतर सोशल मीडियावरही विजयाचा गुलाल ट्रेंडिंगवर होता.