

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच अमली पदार्थ तस्करी टोळ्यांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. शहरासह उपनगरांमध्ये गांजाचा मुलबक पुरवठा होऊ लागला आहे. चिपरी फाट्यावरील कारवाईपाठोपाठ राजारामपुरीत स्थानिक गुन्हे अन्वेषणने सोमवारी छापेमारी करून गांजा तस्कराला जेरबंद केले. आदित्य किरण अवघडे (वय 19, रा. मातंग वसाहत, राजारामपुरी, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. संशयिताकडून 55 हजार रुपये किमतीचा गांजा हस्तगत करण्यात आला.
शहरात रंकाळा टॉवर, इराणी खण, क्रशर चौक परिसरासह शिंगणापूर, चंबुखडी, विक्रमनगर, टेंबलाईवाडी, शेंडा पार्क, महामार्गावरील उजळाईवाडी उड्डाणपूल परिसरात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गांजा तस्करांची वर्दळ पुन्हा वाढीला लागली आहे. बनावट दारूसह गांजा तस्करीचा खुलेआम बाजार सुरू झाल्याने ऐन निवडणुकीच्या धामधुमीत तस्करांचे मोठे आव्हान प्रशासनाला पेलावे लागणार आहे.
राजारामपुरी येथील आदित्य अवघडे याने राहत्या घरात गाजासाठा करून त्याची विक्री सुरू केल्याची माहिती पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांना मिळाली. वरिष्ठ अधिकार्यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सुशांत चव्हाण, सहायक निरीक्षक सागर वाघ यांनी संशयितावर पाळत ठेवली. पथकाने बनावट गिर्हाईक पाठवून तस्करीची खात्री केल्यानंतर पथकाने अवघडे याच्या घरावर छापा टाकला. झडतीत 55 हजार 200 रुपये किमतीचा 2 किलो 250 ग्रॅम गांजा हस्तगत करण्यात आला.
सांगली जिल्ह्यातील जत, कवठेमहांकाळ तालुक्यातून संशयिताने गांजाची तस्करी केल्याची माहिती चौकशीतून पुढे येत आहे. गांजा कोणाकडून खरेदी केला, याची माहितीही घेतली जात आहे. अवघडेसह शहरातील किती तस्करांचे सीमाभागातील सराईत टोळ्यांशी कनेक्शन आहे, याचाही शोध घेण्यात येत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
रविवारी (दि. 4) चिपरी फाट्याजवळ मिरज येथील सराईत गुन्हेगार वैभव राजाराम आवळे (26, रा. हडको कॉलनी, शंभर फुटी रस्ता) यास जेरबंद करून 1 लाख 82 हजार रुपये किमतीचा गांजा हस्तगत करण्यात आला. पाठोपाठ राजारामपुरी येथे छापेमारी करून गांजा हस्तगत करण्यात आला आहे. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत गांजा तस्करीतील उलाढाल वाढू लागल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.