Municipal-Nagarpanchayat elections | लई चुरस मर्दा... 300 कोटींचा खुर्दा!

जिल्ह्यातील नगरपालिका-नगरपंचायत निवडणुकांत पैशाचा वारेमाप वापर झाल्याची कुजबुज
Municipal-Nagarpanchayat elections
Municipal-Nagarpanchayat elections | लई चुरस मर्दा... 300 कोटींचा खुर्दा!File Photo
Published on
Updated on

सुनील कदम

कोल्हापूर : जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये पैशाचा बेफाम वापर झाल्याच्या चर्चा आता ठिकठिकाणी झडताना दिसत आहेत. या निवडणुकीमध्ये जवळपास 300 कोटी रुपयांचा खुर्दा झाल्याची कुजबुज आता जिल्हाभर ऐकायला मिळत आहे.

13 ठिकाणी निवडणूक

जिल्ह्यातील जयसिंगपूर, कुरुंदवाड, शिरोळ, हुपरी, कागल, गडहिंग्लज, मुरगूड, वडगाव, मलकापूर, पन्हाळा या नगरपालिका आणि आजरा, चंदगड व हातकणंगले या नगरपंचायतींची निवडणूक रणधुमाळी नुकतीच पार पडली. बहुतांश नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका या कमालीच्या चुरशीने पार पडलेल्या आहेत. विजयासाठी सर्वच राजकीय पक्ष, गट-तट आणि उमेदवारांकडून साम-दाम-दंड-भेद आदी सगळ्या मार्गांचा वापर झाल्याचे पाहायला मिळत होते. कागल, जयसिंगपूर, शिरोळ, कुरुंदवाड, मुरगूड, वडगाव या नगरपालिकांच्या निवडणुका तर सुरुवातीपासून वेगवेगळ्या कारणांनी गाजत होत्या. या निवडणुकांमध्ये वेगवेगळ्या कारणांनी विलक्षण चुरस निर्माण झाली होती.

निवडणूक खर्चाची मर्यादा

निवडणूक आयोगाने निश्चित केल्यानुसार या निवडणुकीत नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासाठी खर्चाची मर्यादा होती 7 लाख 50 हजार रुपये! नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराची खर्चाची मर्यादा होती 6 लाख रुपये, तर पालिका आणि पंचायतींच्या सदस्यपदासाठी खर्चाची मर्यादा होती फक्त 2 लाख 50 हजार रुपये! मात्र निवडणुकीतील कमालीची ईर्ष्या आणि चुरस विचारात घेता ही रक्कम चहा-पाण्यालासुद्धा पुरणार नाही याची सर्वांनाच आणि सुरुवातीलाच जाणीव झाली होती. त्यामुळे पहिल्या दिवसापासूनच बहुतांश उमेदवारांनी हात सैल सोडल्याचे दिसत होते.

जंगी जेवणावळी

निवडणुकीचा डंका झडायला लागल्याबरोबर दुसर्‍या बाजूला जंगी जेवणावळीही झडताना दिसत होत्या. बहुतांश उमेदवारांना आपापल्या प्रचारकांच्या ‘श्रमपरिहाराची’ सोय रात्रंदिवस तर करावीच लागत होती; मात्र त्याच बरोबरीने प्रत्येक मतदाराने ‘तृप्तीचा ढेकर’ दिला पाहिजे, याचीही तजवीज करावी लागत होती. त्यामुळे कुणी खासगी ठिकाणी, कुणी हॉटेल-धाब्यांवर चोरीछुपे या मेजवानीच्या पंगती उठविलेल्या दिसत होत्या. कार्यकर्त्यांमार्फत दररोज न चुकता बहुतांश मतदारांना जेवणाची कूपन पोहोचविली जात होती, अशीही चर्चा आहे; तर कुणाला थेट चिकन-मटण घरपोच होत होते म्हणे! याच्या जोडीने ‘तळीरामांची तलफ’ भागविण्याची सोयही वरचेवर करावी लागत असणार! परिणामी, बहुतांश तळीरामांनी या दहा-पंधरा दिवसांत ‘दररोज गटारी’ साजरी करण्याचा योग निश्चितच साधवून घेतला असावा.

भेटवस्तूंचा भडिमार

बहुतांश ठिकाणी आणि बहुतांश उमेदवारांनी जेवणावळीच्या जोडीने भेटवस्तूंचाही भडिमार केल्याचीही चर्चा आहे. मतदार भगिनींना कुठे कुठे साड्यांचे, तर आणखी कुठे भेटवस्तूंचे वाटप झाले म्हणे. बहुतांश उमेदवार या मार्गाचा अवलंब करीत असल्याने कुणी कुणाचा बोभाटा करण्याचा किंवा कुणी कुणाबद्दल तक्रार करण्याचा प्रश्नच येत नसणार, हेही खरेच!

चर्चेतील आकडे

या निवडणुकीत कुणी किती खर्च केले आणि कुणी कुठे खर्च केले, याची ठिकठिकाणी चर्चा रंगताना दिसत आहे. एका एका नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत बहुतांश उमेदवारांनी मिळून 5-10 कोटी रुपयांपासून ते 30-40 कोटी रुपयांचा खुर्दा केल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. याबाबतीत कागल, जयसिंगपूर, शिरोळ, हुपरी, गडहिंग्लज, मुरगूड आणि वडगाव नगरपालिकांची जरा जास्तच चर्चा रंगताना दिसत आहे. मात्र, कानावर पडणारे आकडे विचारात घेता या निवडणुकीत किमान 300 कोटी रुपयांचा खुर्दा झाला असण्याचा अंदाज बांधायला हरकत नाही.

मताची किंमत 54 पैसे ते पावणेदोन रुपये!

काही पालिका आणि पंचायतीत एका मतासाठी हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत वाटप झाल्याचाही बोलबाला आहे. पाच वर्षांचा हिशेब करता अशा मतदारांनी आपले मत प्रतिदिन 54 पैसे ते पावणेदोन रुपयांना विकले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. याचा अर्थ केवळ एका मताने काय काय घडू शकते, याची अशा मतदारांना जाण नाही, असे म्हणावे लागेल.

कुठे 24 कोटी आणि कुठे 300 कोटी...

या निवडणुकीतील नगराध्यक्षपदाचे 56 आणि नगरसेवकपदाचे 799 उमेदवार यांनी निवडणूक आयोगाने निश्चित केल्यानुसारच खर्च केला असता, तर तो सगळा खर्च झाला असता 24 कोटी 13 लाख रुपये! पण इथे तर चक्क 300 कोटी रुपयांचा खुर्दा झाल्याची चर्चा आहे. कुठे 24 कोटी रुपयांचा निर्धारित खर्च आणि कुठे 300 कोटी रुपयांचा खुर्दा!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news