

कोल्हापूर : महानगरपालिकेची निवडणूक भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) अशी महायुती म्हणूनच लढणार आहोत, अशी माहिती भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीला महायुती म्हणून एकत्रित व एका विचारानेच सामोरे जाणार आहोत. याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला आहे. जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप निश्चित झालेला नाही. मात्र, गेल्या सभागृहात भाजप आणि ताराराणी आघाडी मिळून 33 जागा होत्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 14 जागा होत्या तर शिवसेनेच्या चार जागा होत्या. आता उरलेल्या जागांचे वाटप होईल. भाजपमधून काही नगरसेवक शिवसेनेत गेले असले तरी त्या जागा भाजपकडे राहतील. मेरीट असणार्या उमेदवारांना तिकीट दिले जाईल. भाजप या निवडणुकीत 30 टक्के जागा तरुण उमेदवारांना देणार आहे. उत्तर विधानसभा मतदार संघातील जागांमध्ये आमदार राजेश क्षीरसागर यांचे तर दक्षिण विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार अमल महाडिक यांना प्राधान्य राहील.
पक्षाचा जाहीरनामा जनतेतून घेणार
गेल्या अडीच वर्षात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर शहरासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. त्यातून अनेक कमी सुरू आहेत. आमदार क्षीरसागर यांच्या प्रयत्नामुळे महानगरपालिकेतील रोजंदारी कर्मचारी सेवेत कायम झाले आहेत. पक्षाचा जाहीरनामा यावेळी आम्ही जनतेतून घेणार आहोत. नागरिकांना सूचना पाठवण्याचे आवाहन करणार आहोत, असेही खा. महाडिक म्हणाले.
महायुतीत भाजपच मोठा भाउ
महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीत घटक पक्षांमध्ये समान जागा वाटप होईल. मात्र जागा वाटपात महायुतीत भारतीय जनता पक्षच मोठा भाउ आहे, हे मात्र निश्चित आहे. मोठा भाउ म्हणून आम्ही जबाबदारी सांभाळत आहे. अशा शब्दात खासदार धनंजय महाडिक यानी जागा वाटपाबाबत भाष्य केले.