

आशिष शिंदे
कोल्हापूर : ताई-माई-अक्का, विचार करा पक्का या पारंपरिक प्रचाराला फाटा देत यंदाच्या महापालिका निवडणूक प्रचारात कृत्रिम बुद्धिमत्तेने आपला वेगळा ठसा उमटविला आहे. एआयच्या मदतीने क्षणाक्षणाला विरोधकांवर आरोपांच्या फैरी झडू लागल्या असून, प्रचार आक्रमक आणि लक्षवेधी झाला आहे. याच एआय तंत्रज्ञानातून थेट मार्व्हल्स कॉमिक्समधील अॅव्हेंजर्स कॅरेक्टर्स प्रचाराच्या रिंगणात अवतरली आहेत. थॅनॉस, आयर्नमॅन, हल्क, कॅप्टन अमेरिका, स्पायडरमॅन यांसारख्या सुपरहिरो एआयच्या साहाय्याने स्थानिक राजकीय प्रचारात उतरले आहेत. मुंबई, पुणे, कोल्हापूरसह विविध महापालिकांसाठी स्थानिक भाषांमध्ये हे सुपरहिरोज प्रचार करतानाचे एआय जनरेटेड व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.
एका महापालिकेत थॅनॉस चक्क खादीचे कपडे घालून एक पक्षाचा, तर कुठे दुसर्या पक्षाचा प्रचार करताना दिसत आहे. विशेष म्हणजे हा थॅनॉस मराठीतून संवाद साधत असून, स्थानिक प्रश्नांच्या आधारे विरोधकांवर टीका करत आहे. एआयमुळे थॅनॉसचा अवतार जरी काल्पनिक असला, तरी संवाद मात्र थेट मतदारांच्या जिव्हाळ्याच्या मुद्द्यांवर बोट ठेवणारा आहे.
काही ठिकाणी हल्क सुपरहिरोला जुना निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून दाखवण्यात आले आहे. गळ्यात पक्षाचे स्कार्फ, डोक्यावर गांधी टोपी घालून माझ्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्याला का डावलले? असा सवाल करत तो रडताना दिसतो. तर दुसर्या मतदारसंघात हाच हल्क गळ्यात स्कार्फ घालून मोठ्या जनसमुदायासोबत रॅलीतून चालताना, प्रत्येकाला हात जोडत अभिवादन करताना दिसतो. काही व्हिडीओंमध्ये तो थेट स्टेजवरून मराठीत भाषण करताना दाखवण्यात आला आहे. तर काही ठिकाणी हे सुपरहिरोज एकमेकांवर आरोप करताना दिसत आहेत.
स्पायडरमॅन ‘मी स्पायडरमॅन म्हणून नाही, तर कॉमनमॅन म्हणून निवडणूक लढवत आहे’, असे सांगत सामान्य मतदारांशी नाते जोडण्याचा प्रयत्न करतो. तर कॅप्टन अमेरिका आज उमेदवार झाल्यानंतर मी थॅनॉस दादांना भेटण्यासाठी आलो आहे, असे म्हणत राजकीय टोलेबाजी करताना दिसतो.
एआयच्या या प्रयोगांमुळे निवडणूक प्रचार अधिक आकर्षक झाला आहे. आता थेट हॉलीवूड चित्रपटातील सुपरहिरोज थेट प्रचाराच्या मैदानात आल्याने प्रचाराला मनोरंजनाची किनार मिळाली असली, तरी आरोप-प्रत्यारोपांची धार अधिक तीव— झाली आहे.
थॅनॉसमध्ये सृष्टी नष्ट करण्याइतकी शक्ती
मार्व्हल्स कॉमिक्समधील हे कॅरॅक्टर्स जागतिक पातळीवर प्रचंड लोकप्रिय असून प्रत्येकाची स्वतंत्र ओळख आणि ताकद आहे. थॅनॉस हा संपूर्ण विश्वाचा समतोल राखण्यासाठी अर्धी सृष्टी नष्ट करण्याइतकी अमर्याद शक्ती असलेला खलनायक म्हणून ओळखला जातो. हल्क हा राग वाढला की ताकदही वाढणारा सुपरहिरो असून त्याची शारीरिक शक्ती अमानवी आहे. आयर्नमॅन हा बुद्धिमत्तेचे प्रतीक मानला जातो. कॅप्टन अमेरिका हा देशभक्ती तर स्पायडरमॅन हा ‘कॉमनमॅन’ सुपरहिरो म्हणून ओळखला जातो.