

कोल्हापूर : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. मतसंग्रामाच्या रणांगणात उतरलेल्या उमेदवारांसाठी रविवार प्रचाराचा ‘सुपर संडे’ ठरला. आरोप-प्रत्यारोप, त्यातून टोकाला गेलेली ईर्ष्या यामुळे प्रभागात चुरस वाढत चालली आहे. या चुरशीने प्रचाराचा ज्वरही वाढला आहे. मंगळवारी प्रचाराची सांगता होणार असून गुरुवारी मतदान होत असल्याने रविवारची सुट्टी ‘कॅच’ करत अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांनी प्रयत्न केले. यामुळे शहरातून दिवसभर प्रचाराचा गल्ली-बोळात अक्षरश: धुरळा उडाला होता. कॉर्नर सभा, वैयक्तिक गाठी-भेटी, प्रचार पत्रकांचे वाटप, रॅलींनी अवघं शहर निवडणूकमय झाले होते.
महापालिकेच्या 81 जागांसाठी 20 प्रभागांतून 327 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. गेल्या आठ दिवसांपासून शहरात प्रचार सुरू आहे. जाहीर प्रचाराला केवळ दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. तत्पूर्वी रविवारच्या सुट्टीची पर्वणी साधत सर्वच उमेदवारांनी प्रचाराचा धडाका उडवला. सकाळपासूनच घराबाहेर पडत पायाला भिंगरी बांधल्यासारखे उमेदवार, कार्यकर्ते प्रभागात फिरताना दिसत होते. सकाळी दहा वाजल्यानंतर प्रचाराचे रण चांगलेच तापले होते. गल्ली-बोळातून उमेदवारांच्या प्रचार फेर्या निघत होत्या.
यामुळे शहरातील प्रमुख पेठांपेठांतील रस्त्यावर हलगी, ताशा, घुमके, कैताळ आदींसह घोषणांचा दणदणाट, डोक्यावर पक्षाच्या टोप्या, गळ्यात मफलर, हातात ध्वज आणि फलक घेतलेले कार्यकर्ते आणि हात जोडत पुढे जाणारे उमेदवार असेच चित्र दिसत होते. बहुसदस्यीय पद्धतीमुळे काही ठिकाणी महाविकास, महायुती, तिसरी आघाडी तसेच जनसुराज्य शक्ती व रिपब्लिकन पार्टीच्या आघाडीतील उमेदवार आपल्या सहकारी उमेदवारांसोबत प्रचार करताना दिसत होते. काही ठिकाणी उमेदवारांनी स्वतंत्रपणे प्रचार करण्यास प्राधान्य दिले. घराघरांत जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत उमेदवार विजयी करण्याचे आवाहन करत होते.
शिवाजी पेठ, रंकाळा, दुधाळी परिसरासह जुन्या पेठांत नोकरदार मतदारांची संख्या जास्त असल्याने रविवारच्या सुट्टीची उमेदवारांनी संधी साधली. दुपारनंतर प्रचार फेर्या काढत मतदारसंघ पिंजून काढला. महिला कार्यकर्त्यांनी महिला मतदारांची खास भेट घेतली. ठिकठिकाणी हळदी-कुंकू कार्यक्रमाद्वारेही महिला मतदारांशी संवाद साधला जात होता. टिंबर मार्केट, गंजी माळ, छत्रपती संभाजीनगर, गजानन महाराजनगर, विभागीय क्रीडा संकुल परिसर, पद्मावती मंदिर, शाहू बँक चौक, पाण्याचा खजिना परिसर, सिद्धाळा उद्यान, पाटाकडील तालीम मंडळ परिसरातून प्रचाराच्या रॅली, कोपरा सभा, बैठकांद्वारे प्रचार करण्यात आला. प्रचारासाठीची विविध वाहने, वाद्य पथकामुळे प्रभागात वातावरण निर्मिती केली जात होती. मंगळवार पेठ, रविवार पेठ, बुधवार पेठ आदींसह शाहूपुरी, राजारामपुरी परिसरातही रस्ते निवडणूकमय झाले होते. प्रचार फेर्या, कार्यकर्त्यांची वर्दळ यामुळे परिसरातील संपूर्ण वातावरण दिवसभर निवडणूकमयच झाले होते.
कनाननगर, विचारे माळ, सदर बाजार, कदमवाडी, भोसलेवाडी, कामगार चाळ आदी परिसरात प्रचाराचा धुरळा उडाला होता. गल्ली-बोळातून काढलेल्या प्रचार फेर्यांनी सारा परिसर उमेदवारांच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. या परिसरात बहुतांश उमेदवारांनी मोठ्या प्रचार फेर्या काढत शक्तिप्रदर्शन केले. फुलेवाडी उपनगर परिसरात दिवसभर उमेदवारांनी मित्र परिवार तसेच नातेवाईकांना प्रचार फेरीत सहभागी करून शक्तिप्रदर्शन केले. फुलेवाडी रिंग रोड परिसरात सकाळी अनेक उमेदवारांनी रॅली काढल्या. फुलेवाडी परिसरात सायंकाळी महिला रॅली निघाली. साने गुरुजी वसाहत परिसर तसेच कळंबा रिंगरोड परिसरातही उमेदवारांनी पदयात्रा काढून शक्तिप्रदर्शनावर भर दिला.
महिलांचा मोठा सहभाग
रविवारी प्रचाराचा धुरळा उडाला. त्यात महिला कार्यकर्त्यांचा प्रचंड सहभाग होता. बहुतांश उमेदवारांच्या प्रचार फेर्यात महिलाच कार्यकर्त्या अग्रभागी असल्याचे चित्र होते. महिला उमेदवारांच्या रविवारच्या प्रचाराची धुराही अनेक ठिकाणी महिला कार्यकर्त्याच सांभाळत असल्याचेही चित्र दिसत होते.
रात्री कार्यालयात गर्दी; दोन दिवसांच्या जोडण्यांना गती
दिवसभराच्या प्रचारानंतर रात्री उमेदवारांच्या संपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. प्रचाराला आता दोनच दिवस शिल्लक राहिल्याने उर्वरित दिवसांची प्रचाराची रणनीती, अखेरच्या दिवसाचे शक्तिप्रदर्शन मतांसाठी विविध जोडण्या आदींचे नियोजन केले जात होते.