

कोल्हापूर : जिल्ह्यातील दहा नगर परिषदा आणि तीन नगर पंचायतीच्या प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत बुधवारी (दि. 8) काढण्यात येणार आहे. नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेकांचा अपेक्षाभंग झाला होता. आता किमान प्रभागाचे आरक्षण तरी मनासारखे पडूदे, यासाठी इच्छुकांच्या नजरा या सोडतीकडे लागल्या आहेत.
जिल्ह्यातील जयसिंगपूर, गडहिंग्लज, कुरुंदवाड, मलकापूर, पन्हाळा, वडगाव, मुरगूड, कागल, हुपरी, शिरोळ या दहा नगर परिषदेसाठी तर हातकणंगले, आजरा व चंदगड या तीन नगर पंचायतीसाठी सोडत काढली जाणार आहे. त्या त्या नगरपालिकांनी निश्चित केलेल्या ठिकाणी ही सोडत काढली जाणार आहे. या सोडतीवर दि. 9 ते 14 या कालावधीत हरकती व सूचना स्वीकारल्या जाणार आहेत. या हरकतीवरील दि. 17 पर्यंत जिल्हाधिकारी अभिप्रायासह आपला अहवाल विभागीय आयुक्तांना सादर करणार आहेत. दि. 24 पर्यंत विभागीय आयुक्त त्यावर अंतिम निर्णय घेणार असून दि. 28 ऑक्टोबर रोजी संबंधित मुख्याधिकारी प्रभागनिहाय आरक्षण राजपत्रात प्रसिद्ध करणार आहेत.