kolhapur water supply | 161 कोटींच्या थकीत बिलासाठी मनपाचा पाणीपुरवठा होणार बंद

जलसंपदा विभाग अधीक्षक अभियंत्यांच्या नोटिसीमुळे खळबळ; शहरवासीयांची पाण्यासाठी होणार पळापळ
Kolhapur water supply to be cut off for two days from today
कोल्हापूरचा पाणीपुरवठा आजपासून दोन दिवस बंदPudhari File Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेने 161 कोटी रुपयांची थकबाकी न भरल्याने जलसंपदा विभागाने आक्रमक भूमिका घेतली आहे. थकीत रक्कम न भरल्यास शहराचा पाणीपुरवठा खंडित करणार असल्याची नोटीस अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे यांनी शुक्रवारी महापालिका आयुक्तांना पाठविली. पाणीपुरवठा बंद झाल्यास शहरवासीयांची पाण्यासाठी पळापळ होणार आहे. या नोटिसीमुळे खळबळ उडाली असून आयुक्तांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

शहरासह शेजारील गावांना महापालिकेतर्फे पाणीपुरवठा केला जातो. जलसंपदा विभागाकडून महानगरपालिका काळम्मावाडी आणि पंचगंगा नदीतून 76 द.ल.घ.मी. पाणी घेेते. दरवर्षी महापालिकेस जलसंपदा 18 कोटी रुपयांचे बिल पाठविते. कित्येक वर्षे महापालिकेने एकरकमी बिल भरले नसल्याचे सांगण्यात येते. जानेवारी 2026 अखेर 161 कोटी रुपये थकीत आहेत. यापूर्वी महापालिका शिंगणापूर, बालिंगा आणि नागदेववाडी या ठिकाणाहून दरवर्षी 76 द.ल.घ.मी. पाणी उपसा करून शहरास पुरवठा करत असे. थेट पाईपलाईन योजनेमुळे आता काळम्मावाडी धरणातून उपसा सुरू आहे; तर नागदेववाडी आणि बालिंगा येथूनही बंद काळात उपसा केला जातो. सध्या महापालिकेकडे पाणीपट्टीची 161 कोटी 77 लाख 28 हजार 419 रुपयांची थकबाकी आहे.

जलसंपदा मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीत महापालिकेने किमान दहा कोटी रुपये भरण्याची ग्वाही दिली. मात्र यापैकी काहीच रक्कम भरली नाही. पालकमंत्री प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासोबत नुकतीच बैठक होऊन थकबाकीबाबत सविस्तर चर्चा झाली आहे. पालकमंत्र्यांनीही सूचना दिल्या. मात्र महापालिका स्तरावर काहीच हालचाल होत नसल्याने पाणी पुरवठा बंद करण्याची नोटीस पाठविण्यात आल्याचे जलसंपदा विभागातून सांगण्यात आले.

95 टक्के घरगुती, 4.90 टक्के व्यापारी आणि 0.10 टक्के औद्योगिक दराने पाणीपट्टी आकारणीची महापालिकेची मागणी जलसंपदा विभागाने मान्य केली आहे. असे असूनही महापालिका पाणीपट्टी भरण्यास धजत नसल्याने आता पाणी पुरवठा बंद करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news