municipal corporation elections
municipal corporation elections | महापालिकेसाठी आज मतदान; उद्या फैसला

municipal corporation elections | महापालिकेसाठी आज मतदान; उद्या फैसला

यंत्रणा सज्ज : नेत्यांची प्रतिष्ठा पणाला; मतमोजणीचीही तयारी पूर्ण
Published on

कोल्हापूर : कोल्हापूरसह इचलकरंजी महापालिकेवर सत्तेसाठी महिनाभर सुरू असलेल्या राजकीय संघर्षात टोकाला गेलेली ईर्ष्या, झालेले आरोप-प्रत्यारोप, त्यातून दिवसागणीक वाढत गेलेली चुरस आणि ढवळून निघालेल्या राजकीय वातावरणात गुरुवारी (दि. 15) चुरशीने मतदान होत आहे. सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होणार्‍या मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. महापालिकेसाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्याचबरोबर उमेदवारांचा उत्साह आणि धाकधूकही वाढली आहे. महापालिका कोणाची? याचा फैसला शुक्रवारी (दि. 16) होणार असून, दुपारपर्यंतच सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. मतमोजणीचीही प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे.

कोल्हापूर शहरातील 20 प्रभागांतील 81 नगरसेवकांच्या जागांसाठी 157 महिला उमेदवारांसह एकूण 327 जण निवडणूक रिंगणात आहेत. गुरुवारी शहरातील एकूण 593 मतदान केंद्रांवर 4 लाख 94 हजार 711 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदानासाठी एकूण 4 हजार 610 कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदानासाठी निवडणूक कार्यालयातून बुधवारी सकाळी मतदान साहित्यासह कर्मचारी मतदान केंद्रांवर रवाना झाले.

कोल्हापूर महापालिकेवरील सत्तेसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीने कंबर कसली आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुती म्हणून एकसंधपणे निवडणूक लढवत आहेत, तर महाविकास आघाडीचा प्रमुख घटकपक्ष असलेल्या काँग्रेसने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोबत घेऊन महायुतीविरोधात शड्डू ठोकला आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आम आदमी पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊन शाहू आघाडीच्या माध्यमातून महाविकास आणि महायुतीला आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. महायुतीतील भाजपचा सहयोगी पक्ष असलेल्या जनसुराज्य शक्तीनेही रिपब्लिकन पक्षाच्या मदतीने आपलाही सवतासुभा मांडला आहे. मात्र, महापालिकेसाठी बहुतांशी सर्वच ठिकाणी महायुती आणि महाविकास यांच्यात थेट संघर्ष आहे.

महायुतीतून पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर यांनी; तर दुसरीकडे महाविकास आघाडीतून काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी प्रचाराचा तंबू एकहाती सांभाळला. थेट पाईपलाईन योजनेवरून सुरू झालेल्या आरोप-प्रत्यारोपांनी अखेरच्या टप्प्यात टोक गाठले. यामुळे महापालिकेच्या अनेक प्रभागांत ईर्ष्या वाढत गेली आणि त्यातून चुरस निर्माण झाली आहे. याच चुरशीने उद्या मतदान होईल, अशी शक्यता आहे.

शहरातील 20 प्रभागांतील 81 लढतींपैकी 17 ठिकाणी एकास एक अशा थेट लढती होणार आहेत. यासह पाच ठिकाणी अन्य उमेदवार असले, तरीही खरी लढत महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांतच होत आहे. शहरात 8 ते 10 ठिकाणी हायव्होल्टेज लढती होत असून, त्यावर शहराचेच नव्हे; तर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. 19 ठिकाणी थेट तिहेरी लढती होत आहेत. या लढतींत गतसभागृहातील 26 माजी नगरसेवकांसह एकूण 53 माजी नगरसेवक पुन्हा आपले नशीब आजमावत आहेत.

बुधवारीही उमेदवार, कार्यकर्ते मतदारांच्या संपर्कात होते. छुप्या पद्धतीने प्रचार सुरूच होता. गाठीभेटींसह बैठकाही सुरू होत्या. सायंकाळनंतर या सर्व प्रकारांना वेग आला. रात्री उशिरापर्यंत कार्यकर्त्यांची धावपळ सुरू होती. मतदानाच्या पूर्वसंध्येला गैरप्रकार होऊ नये, याकरिता ठिकठिकाणी पोलिसांनी करडी नजर ठेवली होती. वाहनांच्या तपासणीसह भागाभागांत पोलिसांची गस्त सुरू होती. गुरुवारीही मतदानादिवशी अनुचित प्रकार होणार नाही याची दक्षता घेत सर्वत्र कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

गुरुवारी शहरातील 593 मतदान केंद्रांवर सकाळी 7.30 वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे. शहरातील 4 लाख 94 हजार 711 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. शहरातील सर्व 593 मतदान केंद्रांवर बेवकास्टिंग होणार आहे. यामुळे एकाच ठिकाणाहून सर्व मतदान केंद्रांवर नियंत्रण ठेवले जाणार आहे. मतदारयादीत 6 हजार 15 दुबार मतदार आहेत. यापैकी 2 हजार 594 मतदारांनी मतदान कोणत्या केंद्रांवर करणार याबाबतचे हमीपत्र भरून दिले आहे. उर्वरित मतदारांचे मतदान केंद्रांवर आल्यानंतर हमीपत्र भरून घेतले जाणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी 1,300 ‘ईव्हीएम’चा वापर होणार आहे. यापैकी 10 टक्के ‘ईव्हीएम’ राखीव ठेवण्यात आली आहेत. शहरात 384 दिव्यांग मतदार आहेत. त्यांच्यासाठी मतदान केंद्रांवर 200 व्हीलचेअर ठेवण्यात येणार आहेत. वयोवृद्ध मतदारांना मतदान केंद्रापर्यंत ये-जा करण्यासाठी 22 रिक्षांची व्यवस्था करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news