

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेसाठी शनिवार, दि. 10 व रविवार, दि. 11 रोजी टपाली मतदान होणार आहे. निवडणूक कामासाठी नियुक्त असलेल्या अधिकारी, कर्मचारी, बंदोबस्तावरील पोलिस कर्मचारी या मतदारांचे संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात हे मतदान होणार आहे. यासाठी मंगळवार, दि. 6 जानेवारीपर्यंत संबंधितांचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. आतापर्यंत 300 जणांनी टपाली मतदानासाठी अर्ज दाखल केले आहेत.
महापालिकेसाठी दि. 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी 3 हजार 300 हून अधिक अधिकारी, कर्मचारी, पोलिस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांच्यासाठी टपाली मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून त्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी करण्याच्या सूचना प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी आढावा बैठकीत दिल्या.
अन्य मनपाच्या निवडणूक कामातील मतदारांनाही संधी
कोल्हापूर महापालिकेच्या मतदार यादीत नाव असलेल्या; पण राज्यातील अन्य महापालिकेच्या निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या अधिकारी, कर्मचारी, पोलिसांनाही टपाली मतदान करता येणार आहे. याकरिता संबधितांना कोल्हापूर महापालिका हद्दीतील मतदार यादीतील अनुक्रमांकासह ते कार्यरत असलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज सादर करावा लागेल. त्यानंतर संबंधित अधिकार्यांच्या स्वाक्षरी आणि शिक्क्यानिशी आलेल्या अर्जावर संबधित मतदाराला टपालाद्वारे मतपत्रिका पाठवली जाणार आहे.
मतपत्रिका छपाई सुरू
शनिवारी सकाळी चिन्ह वाटप झाले. यानंतर निवडणूक लढवणार्या अंतिम उमेदवारांची चिन्हांसह यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर त्या त्या प्रभागातील मतदान केंद्रांनुसार ईव्हीएम तयार करण्यासाठी मतपत्रिका छपाई सुरू करण्यात आली. शासकीय मुद्रणालयात ही मतपत्रिकांची छपाई करण्यात येत असून या ठिकाणी बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.
बुधवार, गुरुवारी ईव्हीएम सज्ज होणार
छपाई पूर्ण झालेल्या मतपत्रिका घालून ईव्हीएम मतदानासाठी सज्ज केले जाणार आहे. ही सर्व प्रक्रिया बुधवार, दि. 7 व गुरुवार, दि. 8 पर्यंत पूर्ण करा, त्यासह मतदानाची आवश्यक सर्व यंत्रसामग्री सज्ज करून स्ट्राँग रूममध्ये बंदोबस्तात ठेवण्याचे आदेश के. मंजुलक्ष्मी यांनी दिले.
सर्व यंत्रणा कार्यक्षम ठेवा
आता प्रचारात वेग येणार आहे. यामुळे उमेदवारांना विविध परवानग्या घ्याव्या लागणार आहेत. त्यासह आचारसंहिता कक्ष, तपासणी नाके व भरारी पथके अधिक सक्षम व कार्यक्षमपणे कार्यरत ठेवा, अशा सूचनाही प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी दिल्या आहेत.
ताराबाई पार्क येथील मुख्य निवडणूक कार्यालयात आयोजित बैठकीला अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, उपआयुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे, निवडणूक निर्णय अधिकारी संदीप भंडारे, एकनाथ काळबांडे, शक्ती कदम, सुशील संसारे, हरेश सुळ, समीर शिंगटे, श्रीमती रुपाली चौगुले, मुख्य लेखापरीक्षक कलावती मिसाळ, मुख्य लेखाधिकारी राजश्री पाटील, शहर अभियंता रमेश मस्कर, निवडणूक अधीक्षक सुधाकर चल्लावाड, कामगार अधिकारी राम काटकर उपस्थित होते.
मतदान अधिकारी, कर्मचार्यांचे मंगळवारी दुसरे प्रशिक्षण
मतदानासाठी नियुक्त अधिकारी, कर्मचार्यांचे पहिले प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. दुसरे प्रशिक्षण मंगळवार दि. 6 रोजी आयोजित केले आहे. यानंतर मतमोजणीसाठीचे प्रशिक्षण दि. 12 किंवा 13 रोजी आयोजित करा. याशिवाय मतदान केंद्रांवर अधिकारी व कर्मचार्यांना ने-आण करण्यासाठी आवश्यक वाहनांची माहिती तातडीने सादर करण्याचे आदेशही के. मंजुलक्ष्मी यांनी दिले.