

कोल्हापूर : शहरातील मटण मार्केटच्या धर्तीवर इतर दुकानगाळाधारकांनाही २०१५ ते २०१९ या कालावधीत थकबाकीवरील दंड-व्याज माफ केले जाईल. त्यांनी फक्त मुद्दल भरावी. तसेच त्यानंतरच्या कालावधीतील भाड्याची थकबाकी दंड व्याजासह भरावी, अन्यथा लवकरच दीड हजारांवर दुकानगाळे सील केले जातील. भाडेकरूंच्या घरफाळ्यात थकबाकीचा बोजा नोंद करू आणि दुकानगाळ्याचा नव्याने लिलाव करू, असा कडक इशारा आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी शुक्रवारी (दि. ३) पत्रकार परिषदेत दिला.
लवकरच मोठी कारवाई...
आयुक्त डॉ. भारूड म्हणाले, एकूण बजेटच्या ८० टक्के रक्कम पगार, पेन्शन, लाईटसह इतर बाबींवर खर्च होते. महापालिकेच्या मालकीचे १७७० दुकानगाळे असून प्रशासनासाठी ते उत्पन्नाचा मोठा स्रोत आहेत. त्यापैकी १५०० गाळ्यांचे करार संपले असून २०१५ पासून अनेकांनी भाडे भरलेले नाही. सद्यस्थितीत ५० कोटींवर थकबाकी झाली आहे. २०१५ ते २०१९ पर्यंतचे सुमारे १५ कोटी दंड-व्याज महापालिका माफ करण्यास तयार आहे.
अबब... ९ हजार ५०० रुपये भाडे!
हॉकी स्टेडियमच्या शटर, भिंती, रंग नसलेल्या दुकानगाळ्याला प्रत्येकी ९ हजार ५०० रुपये भाडे मिळाले आहे. त्यातून मनपा तिजोरीत वर्षाला ३० लाख जमा होणार आहेत. यात १६ गाळ्यांचे भाड्याच्या माध्यमातून सुमारे १८ लाख आणि डिपॉझिटमधून सुमारे १२ लाख रुपये मिळाले आहेत. दरम्यान, ५८०० फेरीवाल्यांना लवकरच आयकार्ड दिले जाणार आहेत. तसेच शहरातील मॅनहोल बुजवून धोकादायक फांद्या, वृक्ष तोडण्याचे आदेश दिले असल्याचेही आयुक्त डॉ. भारूड यांनी सांगितले.