

कोल्हापूर : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा मृत्यू दि. ६ मे १९२२ रोजी मुंबई येथील ज्या पन्हाळा लॉज या छत्रपतींच्या राजवाड्यात झाला, ती वास्तू त्यांच्या पुरोगामी विचारांचे केंद्र होती. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे असे अनेक विचारवंत यांच्या भेटी-गाठी याच वास्तूमध्ये झाल्या होत्या.
राजर्षी शाहू छत्रपतींचा हा पन्हाळा लॉज नावाचा राजवाडा आजच्या मूंबईतील गिरगाव भागातील खेतवाडी, गल्ली नंबर १३ मध्ये होता. राजर्षींच्या अंतिम क्षणांचा साक्षीदार असणाऱ्या या परिसरात त्यांचे स्मृती स्मारक व्हावे, अशी इच्छा तमाम शाहूप्रेमींची गेल्या ५० वर्षांपासूनची इच्छा होती; मात्र कालौघात या वास्तूच्या ठिकाणी टोलेजंग अपार्टमेंट उभारली असल्याने केवळ एक स्मृतिस्तंभ येथे काही वर्षांपूर्वी उभारण्यात आला. मंगळवारी राज्य शासनाने मुंबईत राजर्षी शाहू महाराज यांचे स्मारक उभारण्याची घोषणा केल्यामुळे या विषयाला पुन्हा उभारी मिळाली आहे.
पन्हाळा लॉज इमारतीत शाहू स्मारक व्हावे
राजर्षी शाहू महाराजांचे निधन ज्या मुंबईत पन्हाळा लॉजवर झाले, त्या इमारतीचेच शाहूंचे स्मारक व्हावे. समाजाच्या कार्यासाठी हे भवन राखले पाहिजे होते. ही इमारत वसतिगृहास उपयुक्त असून मराठ्यांच्या कार्यक्रमास सोईचे आहे. हे ठिकाण एक तीर्थक्षेत्र व तरुणांचे स्फूर्तीस्थान बनेल, अशी महत्त्वाची सूचना भास्करराव जाधव यांनी १९२२ मध्ये केली होती.