

कोल्हापूर : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास दामदुप्पट परतावा देण्याच्या बहाण्याने मुंबईतील पवई येथील वृद्धाची 1 कोटी 10 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई क्राईम ब्रँचच्या पश्चिम विभाग सायबर पोलिस पथकाने बुधवारी मध्यरात्री कोल्हापुरातील बापट कॅम्प व पन्हाळा येथील मुसलमान गल्लीत छापेमारी करून दोघांना अटक केली. चेतन मुकुंद पाडळकर (वय 29, रा. संत गोरोबा कुंभार वसाहत, बापट कॅम्प, कोल्हापूर) व दस्तगीर शमशुद्दीन काझी (52, मुसलमान गल्ली, पन्हाळा) अशी त्यांची नावे आहेत.
गुंतवणुकीवर दामदुप्पट परतावा देण्याच्या बहाण्याने पश्चिम विभाग सायबर पथकाने एकाच वेळी कोल्हापूर व पन्हाळा या ठिकाणी मध्यरात्रीला छापे टाकून दोघांना ताब्यात घेतल्याने कोल्हापूरसह पन्हाळा परिसरात खळबळ उडाली आहे. नितीन बच्चे, विजय घोरपडे, संग्राम जाधव यांच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली. शाहूपुरी आणि पन्हाळा पोलिस ठाण्यांत संबंधितांना ताब्यात घेतल्याची नोंद करण्यात आली आहे. संशयितांना ताब्यात घेऊन सायबर पोलिस सकाळी मुंबईकडे रवाना झाले.
कंबोडिया आणि म्यानमार कनेक्शन असलेल्या आंतरराष्ट्रीय टोळीने मुंबईतील पवई येथील एका 70 वर्षीय वयोवृद्धाशी संपर्क साधला. आंतरराष्ट्रीय कंपन्यांमधील शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास दामदुप्पट परताव्याचे वृद्धाला आमिष दाखविण्यात आले. प्रारंभीच्या काळात वृद्धाच्या ऑनलाईन बँकिंग व्यवहारांवर मोठमोठ्या रकमा जमा झाल्याचे दिसून आले. कालांतराने टप्प्याटप्प्याने गुंतवणूक वाढविण्यात आली. 1 कोटी 10 लाखांच्या रकमेचा भरणा झाल्यानंतर भामट्यांनी संपर्क तोडला. गुंतवणूक केलेली रक्कम परत मिळण्यासाठी वृद्धाने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; पण टाळाटाळ करण्यात आली.
भामट्यांकडून फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबंधित वृद्धाने मुंबई क्राईम ब—ँचकडे तक्रार दाखल केली. चौकशीत टोळीचे मूळ कनेक्शन कंबोडिया आणि म्यानमार येथील असल्याचे सायबर पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न झाले. वृद्धाकडून जमा झालेल्या रकमा मुंबई, पुण्यासह कोल्हापूर व अन्य ठिकाणी असलेल्या 40 व्यक्तींच्या नावे बँक खात्यांत जमा झाल्याचे निष्पन्न झाले. त्यात पन्हाळा येथील दस्तगीर शमशुद्दीन काझी याच्या नावे बँक खात्यावर 7 लाखांची रक्कम जमा झाल्याचे निदर्शनास आले.
मुंबईतील सायबर पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री पन्हाळा येथील काझी याच्या घरावर छापा टाकला. दस्तगीरसह त्याच्या भावाला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. मात्र, दस्तगीरचा सहभाग निष्पन्न झाल्यानंतर भावाची सुटका करण्यात आली. ही कारवाई सुरू असतानाच दुसर्या पथकाने कोल्हापुरातील संत गोरोबा कुंभार वसाहत, बापट कॅम्पमध्ये चेतन मुकुंद पाडळकर याच्या घरावर छापा टाकून त्यास ताब्यात घेतले.
व्यवसायाने इंजिनिअर असलेल्या चेतनला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतल्याची बातमी सकाळी परिसरात पसरली. कुटुंबीय, नातेवाईकांसह परिसरातील नागरिकांना मोठा धक्का बसला. दोन्हीही संशयितांना सकाळी सहा वाजता शाहूपुरी पोलिस ठाण्यात आणण्यात आले.
पाडळकर, काझी यांच्या कुटुंबीयांतील प्रमुखांना बोलावून घेतले. फसवणुकीच्या गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने संबंधितांना पुढील कारवाईसाठी ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर पश्चिम विभाग सायबर सेलचे पथक मुंबईकडे रवाना झाले. संशयितांना उद्या, सकाळी मुंबई येथील न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पथकप्रमुख नितीन बच्चे यांनी सांगितले.