कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सर्व जागा महायुतीच्या निवडून आल्या आहेत. आता महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष आणि सभापती महायुतीचा करण्यासाठी सर्वांनी सज्ज राहावे, असे आवाहन शिवसेना शिंदे गटाचे युवा सेना प्रमुख खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी करत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे शनिवारी रणशिंग फुंकले.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकाराने नागाळा पार्क येथे उभारलेल्या शिवसेना मध्यवर्ती संपर्क कार्यालयाचे उद्घाटन डॉ. शिंदे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि कार्यकर्त्यांच्या अडचणी समजून घेण्याकरिता प्रत्येक जिल्ह्यात अशा प्रकारची संपर्क कार्यालये झाली पाहिजेत. कोल्हापूरच्या विकासासाठी शिवसेना निधी कमी पडू देणार नाही, असेही डॉ. शिंदे यांनी सांगितले.
आबिटकर म्हणाले, या कार्यालयात जिल्ह्यातील शिवसेनेच्या खासदार, आमदारांनी आठवड्यातून एक दिवस येऊन बसावे. विधानसभा निवडणुकीत शिवसेना हा जिल्ह्यातील पहिल्या क्रमांकाचा पक्ष झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत जास्तीत जास्त जागा आणण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे.
आ. चंद्रदीप नरके म्हणाले, जिल्ह्यात आपण म्हणू ती दिशा असा एक विचार होता; परंतु हे कोल्हापूर फार दिवस चालू देत नाही. एखाद्याला डोक्यावर घेतात आणि नंतर खालीही घेतात, हे विधानसभा निवडणुकीत दिसून आले.
माजी खासदार संजय मंडलिक यांनी आणखी काही माजी नगरसेवक लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असून जिल्ह्यातील सर्व स्थनिक स्वराज्य संस्थांवर भगवा फडकाविण्यासाठी एकदिलाने काम करूया, असे सांगितले.
जिल्ह्यातील खासदार, आमदार निश्चित कार्यालयात येतील; परंतु शिवसेनेचे मंत्री कोल्हापूर जिल्ह्याच्या दौर्यावर येतील तेव्हा त्यांनी आपल्या शासकीय बैठका संपल्यानंतर कार्यालयात येऊन कार्यकर्त्यांची मते ऐकून घ्यावीत, असे खासदार धैर्यशील माने यांनी सांगितले. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात दुसरा पक्ष उभारेल की नाही, अशी शंका होती; परंतु या जिल्ह्याने बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जास्तीत जास्त लोक आणण्यासाठी प्रयत्न करूया, असेही ते म्हणाले.
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी जिल्ह्यातील शिवसेना उभारणीचा आढावा घेत विधानसभा निवडणुकीत आपण घंटी वाजवून दाखविली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही भगवा फडकविण्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहनही केले.
यावेळी आमदार डॉ. अशोकराव माने, माजी आमदार जयश्री जाधव, सुजित मिणचेकर, जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण व रवींद्र माने, शहरप्रमुख शिवाजी जाधव, रणजित जाधव, जिल्हा समन्वयक सत्यजित कदम, शारंगधर देशमुख, प्रा. जालंधर पाटील, ललित गांधी, हर्षल सुर्वे आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांना कधीही वार्यावर सोडत नाहीत. लोकसभा निवडणुकीत त्यांनी हातकणंगले मतदारसंघात दोन दिवसांत जादू कशी केली, हे खा. माने यांना माहीत आहे, असे खा. शिंदे म्हणाले.
जिल्ह्यात सर्वाधिक आमदार शिवसेनेचे आहेत. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोणी काही म्हणो, शिवसेनेची भूमिका ही निर्णायक असणार आहे, असे पालकमंत्री आबिटकर म्हणाले.