

कोल्हापूर : पुरोगामी विचार दाबून टाकण्यासाठी कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या केली. दहा वर्षे झाली तरी खुनी का सापडत नाहीत. याबाबत संसदेत प्रश्न उपस्थित करू, अशी ग्वाही खा. शाहू महाराज यांनी दिली.
कॉ. गोविंद पानसरे यांच्या सन्मानार्थ शासनाने दिलेल्या ‘स्वातंत्र्याचे शिलेदार’ या गौरव फलकाच्या अनावरणप्रसंगी ते बोलत होते. कॉ. पानसरे यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम झाला. खा. शाहू महाराज आणि कॉ. दिलीप पवार यांच्या हस्ते फलकाचे अनावरण करण्यात आले. शाहू महाराज म्हणाले, एकीकडे पानसरेंचे खुनी पकडण्यात अपयश आलेल्या सरकारने आपली दिशाभूल करण्यासाठी आणि स्वातंत्र्य सैनिकांसाठी आपण काही तरी करतो हे दाखविण्यासाठी हा फलक दिला आहे. पानसरे कोण होते हे पुढील पिढीला समजले पाहिजे, त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.
दिलीप पवार म्हणाले, स्वातंत्र्याला विरोध करणारे आज देशभक्ती शिकवत आहेत. सत्ताधारी नाव महापुरुषांचे घेतात, पण काम मात्र उलट करतात. व्ही. बी. पाटील म्हणाले, पानसरे यांचा खून म्हणजे पुरोगामी विचारांची हत्या आहे. विजय देवणे म्हणाले, आजच्या विषमतावादी वातावरणात खरे शिवाजी महाराज कोण हे नव्या पिढीला पटवून सांगण्याची गरज आहे. यावेळी बाबुराव कदम, भरत रसाळे, अनिल घाटगे यांची भाषणे झाली. कार्यक्रमास उमा पानसरे, स्मिता पानसरे-सातपुते, व्यंकापा भोसले, आर. के. पोवार, उदय धारवाडे, अनिल चव्हाण, वासुदेव कुलकर्णी, गीता पाटकर, बन्सी सातपुते, उपस्थित होते. स्वागत रघुनाथ कांबळे यांनी केले. सतीशचंद कांबळे यांनी प्रास्ताविक केले. बन्सी सातपुते यांनी आभार मानले. यशस्विनी पवार या मुलीने शिवगर्जना सादर केली.