

भडगाव : आईने मला जन्म दिला आणि आता पुनर्जन्मही दिला. तिचे हे उपकार मी कधीच विसरू शकत नाही, हे शब्द आहेत केनवडे येथील विद्या पाटील यांचे. गेल्या काही महिन्यांपासून मृत्यूशी झुंज देत असलेल्या विद्या यांना त्यांच्या 70 वर्षीय आई अनुसया मारुती खतकर (रा. भडगाव, ता. कागल) यांनी स्वतःची किडनी देऊन जीवदान दिले आहे. मायलेकीच्या नात्याला एका वेगळ्या उंचीवर नेणार्या या घटनेने समाजात एक आदर्श निर्माण केला आहे.
विद्या पाटील (वय 44) यांना गेल्या चार वर्षांपासून मुतखड्याचा त्रास होता. दोन शस्त्रक्रिया होऊनही फरक पडला नाही. सहा महिन्यांपूर्वी त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे निदान झाले. सामान्य शेतकरी कुटुंबातील विद्या यांच्यासमोर जीवन-मरणाचा प्रश्न उभा राहिला. अशा कठीण प्रसंगात त्यांचे पती, सासरची मंडळी आणि माहेरच्यांनी मानसिक आधार दिला, पण खरा निर्णय घेतला तो त्यांच्या आई अनुसया यांनी. त्यांनी आपल्या मुलीला किडनी देण्याची तयारी दर्शवली. कोल्हापूर येथील एका रुग्णालयात नुकतीच या दोघींवर यशस्वी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली. सध्या दोघींचीही प्रकृती स्थिर असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे. या घटनेमुळे खतकर कुटुंबाचे कौतुक होत आहे.
किडनी प्रत्यारोपणासाठी किमान दहा लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च येतो. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबांसाठी हा खर्च आवाक्याबाहेरचा असतो. त्यामुळे या गंभीर आजारावरील उपचारांचा समावेश ‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’त करावा, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.