

गांधीनगर : सांगवडे (ता. करवीर) येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. तरुण मुलाच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने आईचेही निधन झाले. मुलाच्या चितेची आग विझण्यापूर्वीच आईने जगाचा निरोप घेतल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. स्वप्निल ऊर्फ अनिल कुमार बिरांजे (वय 35) आणि माया कुमार बिरांजे (वय 55) अशी मृतांची नावे आहेत.
रविवारी (दि. 18) दुपारी 12 च्या सुमारास स्वप्निलचे अचानक निधन झाले. काही दिवसांपूर्वीच त्याची आई माया बिरांजे या माहेरी गेल्या होत्या. मुलाच्या निधनाचे वृत्त समजताच त्या रविवारी रात्री उशिरा गावी परतल्या. सोमवारी सकाळी 8 च्या सुमारास स्वप्निलच्या रक्षाविसर्जनाची तयारी सुरू असतानाच, पुत्राच्या विरहाने व्याकुळ झालेल्या मातेचाही मृत्यू झाला. आज सकाळी आई आणि मुलाचे एकाच वेळी रक्षाविसर्जन करण्याची दुर्दैवी वेळ कुटुंबावर आली.
स्वप्निल एका खासगी कंपनीत कामाला होता. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, वडील, एक भाऊ आणि दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. या घटनेमुळे सांगवडे परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.