

कोल्हापूर : आयुष्याच्या वळणावर नियतीने घेतलेली एक कलाटणी आणि त्यातून सुटलेली कुटुंबाची वीण. पण काळाच्या ओघात दुरावलेली नाती पुन्हा एकत्र आली आणि त्या भावनिक क्षणाने उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले. एका कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्ताने आई आणि मुलीची तब्बल 15 वर्षांनंतर झालेली भेट, एकमेकांना कवटाळून आनंदाने रडताना ओलावलेली नजर पाहून उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू तरळत होते. हरवलेली पाखरे पुन्हा आईच्या पदराखाली एकत्र आल्याचे समाधान प्रत्येकाला वाटत होते.
मुंबईतील एका खासगी कंपनीत काम करताना मूळची तामिळनाडूची महिला आणि महाराष्ट्रातील तरुणाची ओळख झाली. ही ओळख प्रेमात बदलली आणि त्यांनी विवाह केला. संसार सुखाचा सुरू झाला. दोन मुली आणि एक मुलगा असा त्यांचा छोटासा परिवार होता. मात्र, नियतीने वेगळंच भविष्य लिहिलं होतं. वडिलांचा अचानक मृत्यू झाल्यानंतर आई दोन लहान मुलांना घेऊन माहेरी तामिळनाडूला परत गेली. मोठी मुलगी मात्र वडिलांच्या म्हातार्या आई-वडिलांचा आधार बनून त्यांच्यासोबत कोल्हापुरातच राहिली. आईच्या मायेशिवाय ती वाढली. आईने तामिळनाडूमध्ये दुसरा संसार सुरू केला. पण पहिली मुलगी तिच्या आठवणीत कायम होती. काही महिन्यांनी फोनवर होणारं थोडंसं मराठी, हिंदी आणि तामिळ यांचे मिश्रण असलेला तोडका मोडका संवाद होत होता.
आकनूर (ता. राधानगरी) येथील एका कौटुंबिक कार्यक्रमात 15 वर्षांनी ही सगळी भावंडं, आई, आणि आजी पुन्हा एकत्र आली. ओळख विसरलेल्या चेहर्यांतून नात्यांनी आपला रस्ता शोधला. एकमेकांना घट्ट कवटाळून अश्रूंना वाट मोकळी करून दिली. आईच्या मिठीत हरवलेली माया, मातृत्वाचा स्पर्श, आणि नात्यांना सापडलेला नवा सूर... सगळ्यांच्याच डोळ्यांत पाणी आले. या हृदयस्पर्शी प्रसंगातून पुन्हा एकदा सिद्ध झालं की, नातं केवळ रक्ताचं नसतं. ते आठवणींचं, प्रेमाचं आणि आशेचंही असतं.