विशाळगड : थंडीची चाहूल लागताच अनेकांना मॉर्निंग वॉकला जाण्याचा मोह आवरत नाही. सकाळी लवकर उठून प्रसन्न वातावरणात चालणे हे केवळ शारीरिक नव्हे, तर मानसिक आरोग्यासाठीही उत्तम आहे. डॉक्टरांच्या मते, नियमित मॉर्निंग वॉकमुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो, रक्तदाब नियंत्रित राहतो आणि दिवसभर उत्साह टिकून राहतो. मात्र, आरोग्य आणि फिटनेसचा हा मार्ग सुरक्षित असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
सध्याच्या बदलत्या जीवनशैलीत मॉर्निंग वॉकदरम्यान काही महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास अपघात किंवा अन्य धोके उद्भवू शकतात. त्यामुळे, सकाळच्या या आरोग्यदायी सवयींचा लाभ पूर्णपणे घेण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. शाहूवाडी तालुक्यात सध्या थंडीच्या लाटेमुळे दाट धुके पसरले आहे, तर दुसरीकडे बिबट्यांचा वाढता वावर नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे. थंडी वाढल्यामुळे सकाळच्या प्रहरी धुके पसरत आहे. रस्त्यावर किंवा शेतीच्या काठावर असलेल्या या धुक्याच्या जाड चादरामुळे काही फुटांवरील वस्तूही स्पष्ट दिसत नाहीत. याचबरोबर ऊसशेती, ओसाड जागा आणि पाणवठ्यांच्या परिसरात बिबट्यांचा वावर वाढल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
वन विभागाचे आवाहन
या पार्श्वभूमीवर, वन विभागाने नागरिकांना विशेषतः सकाळी आणि रात्रीच्या वेळी बाहेर पडताना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. बिबट्याच्या हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
ही घ्या काळजी :
दाट धुक्यात एकट्याने जाणे टाळा.
मोबाईलची टॉर्च किंवा हातातील टॉर्च नेहमी सुरू ठेवा.
रस्त्याच्या कडेने असलेल्या ऊसशेती, झुडपे, ओसाड जागा टाळा.
आसपासच्या हालचालींकडे लक्ष ठेवा.
बिबट्या दिसला, तर घाबरून पळू नका.
संशयास्पद हालचाल दिसल्यास तत्काळ वन विभागाला कळवा.