

आशिष शिंदे
कोल्हापूर : मान्सून जाता जाता पुन्हा जोरदार बरसण्याच्या तयारीत आहे. अखेरच्या टप्प्यात असलेला पाऊस सप्टेंबरअखेरीस राज्यात पुन्हा एकदा जोरदार कोसळण्याची शक्यता हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. बंगालच्या उपसागरात 22 सप्टेंबरपासून कमी दाबाचे क्षेत्र (लो प्रेशर एरिया) निर्माण होऊन 24 सप्टेंबरपर्यंत ते अधिक तीव्र होण्याचा अंदाज आहे. परिणामी मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकण किनारपट्टी, मुंबईमध्ये 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरदरम्यान मुसळधार कोसळू शकतो.
पावसासाठी पोषक असे वातवरण तयार होत असल्याने राज्यात पुन्हा जोरदार सरी बरसण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात 22 सप्टेंबरपासून कमी दाबाचे क्षेत्र (लो प्रेशर एरिया) निर्माण होऊन 24 सप्टेंबरला वायुदाब क्षोभ (डिप्रेशन) तर 25 सप्टेंबरपर्यंत वायुदाब क्षोभ (डीप डिप्रेशन) मध्ये परिवर्तित होण्याची शक्यता आहे. याचे छोट्या चक्रवादळातही रूपांतरित होऊ शकते, असा अंदाज आहे. कोकण किनारपट्टी, मुंबई आणि गुजरातमध्ये 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरदरम्यान 16 ते 20 ऑगस्टदरम्यान झालेल्या पावसासारखीच परिस्थिती पुन्हा निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्राला 25 ते 28 सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
मान्सून इंट्रा-सीझनल ऑस्सिलेशन : मान्सून हंगामात पावसाचा जोर सतत सारखा नसतो. कधी कमी तर कधी भरपूर पाऊस असे टप्पे येतात. मिसोमुळे हे होते. अंतिम मिसो पल्स म्हणजे मान्सून संपण्यापूर्वी येणारा शेवटचा पावसाचा जोरदार टप्पा.
मॅडेन-जुलियन ऑस्सिलेशन (एमजेओ) : हा जगभर पसरलेला मोठा ढगांचा पट्टा आणि पर्जन्याची लाट आहे. तो विषुववृत्ताभोवती 30 ते 60 दिवसांच्या चक्रात फिरतो. जिथे एमजेओ सक्रिय होतो, तिथे ढगांची वाढ आणि जोरदार पाऊस होतो.
रॉस्बी लहरी : या म्हणजे ग्रहस्तरीय लहरी, पृथ्वीच्या फिरण्यामुळे वातावरणात निर्माण होतात. चक्रीवादळे, पर्जन्य क्षेत्रे पूर्व पश्चिम दिशेने हलविण्याचे काम रॉस्बी लहरी करतात.
एमआयएसओचा अंतिम पल्स, एमजेओ व रॉस्बी लहरींची परस्परक्रिया आणि निगेटिव्ह आयओडी यांच्या संगमामुळे निर्माण होणारी ही हवामान प्रणाली मध्य भारतावरून महाराष्ट्रात धडकणार आहे. या काळात मान्सून वॉर्टेक्स तयार होण्याचीही शक्यता असल्याने 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरदरम्यान जोरदार पाऊस होईल.
अथ्रेय शेट्टी, हवामान तज्ज्ञ, मुंबई