

कोल्हापूर : जिल्ह्यात मंगळवारी दुपारनंतर पावसाची संततधार सुरू झाली. पावसाच्या या दमदार सरींसह जिल्ह्यात अखेर मान्सून दाखल झाला. बहुतांशी वेळी जूनच्या दुसर्या आठवड्यात दाखल होणारा मान्सून यावर्षी मात्र जल्ह्यात 15 दिवस अगोदरच दाखल झाला आहे. राधानगरी धरणात दुपारपर्यंत 4.11 टीएमसी पाणीसाठा झाला असून धरण 49.14 टक्के भरले होते. बुधवारपर्यंत धरण निम्मे भरेल अशी शक्यता आहे.
जिल्ह्यात सोमवारपासून पावसाने काहीशी उघडीप दिली होती. मंगळवारीही सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली. मात्र, दुपारी दोननंतर पावसाला सुरुवात झाली. काही वेळात पावसाचा जोर वाढला. दुपारी सुरू झालेली संततधार रात्रीपर्यंत कायम होती. जोरदार पावसाने शहरातील रस्त्यांवरून पाण्याचे लोट वाहत होते. दुपारनंतर सुमारे सहा-सात तास पाऊस सुरू होता. यामुळे जनजीवनावरही परिणाम झाला.
पावसाने पंचगंगेच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. पहाटे चार वाजता 19.8 पर्यंत पाणी पातळी गेली होती. ती सकाळपासून पुन्हा कमी होत गेली. दुपारी 19.3 फुटापर्यंत कमी झाली होती. दुपारी सुरू झालेल्या पावसाने त्यात पुन्हा वाढ सुरू झाली असून मंगळवारी रात्री पंचगंगेची पातळी 19 फूट 9 इंचावर गेली. पावसाचा जोर असाच वाढत गेला तर गुरुवारपर्यंत पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर पडण्याची शक्यता आहे.सोमवारपासून जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याने नद्यांच्या पाणी पातळीत घट झाली होती. यामुळे तीन बंधार्यांवरील पाणी कमी झाले. जिल्ह्यात सध्या 13 बंधारे पाण्याखाली असून त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.
इचलकरंजी : इचलकरंजी शहरालगत असणार्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत दररोज वाढ सुरूच आहे. मंगळवारी सायंकाळी पाणी पातळी 41 फुटांपर्यंत होती. पाणी पातळीत वाढ झाली असून पंचगंगा नदीचा घाट पाण्याखाली गेला आहे. नदी दुथडी भरून वाहत आहे. शहरात मंगळवारी दिवसभर पावसाची रिपरीप सुरूच होती. मंगळवारी काही काळ पावसाने उघडीप दिली होती. परंतु दुपारनंतर पुन्हा रिपरिप सुरू झाली.
जिल्ह्यामध्ये मंगळवारी सकाळी दहा वाजेपर्यंत गेल्या 24 तासात एकूण सरासरी 16.3 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस भुदरगड तालुक्यात 38.1 मिमी आणि गगनबावडा तालुक्यात 36.2 मिमी झाला. शिरोळ तालुक्यात सर्वात कमी 6.6 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे आतापर्यंत घरांची पडझड होऊन 21 लाख 89 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.