

सुनील सकटे
कोल्हापूर : यंदा हवामानातील बदल लक्षात घेता एल निनो व ला निना या दोन्ही परिस्थितींचा परिणाम होण्याच्या शक्यतेमुळे पाटबंधारे विभागाने आगामी कालावधीतील पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत. 31 ऑगस्ट 2026 पर्यंत धरणांतील उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करून सिंचनाचे नियोजन करण्याचे आदेश आहेत.
यंदा हवामानातील बदल लक्षात घेता एल निनो व ला निना या दोन्ही परिस्थितींचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे पावसाचे प्रमाण 30 ते 40 टक्क्यांपर्यंत कमी राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांतील उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असेही पत्रात म्हटले आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाची तारेवरील कसरत होणार आहे. सध्या जिल्ह्यात सर्व धरणांत मिळून एकूण सुमारे 50 टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा आहे.
कार्यकारी अभियंते तसेच शाखा अभियंत्यांनी पाण्याचा अपव्यय टाळून काटेकोर नियोजन करावे. धरणांतील पाणी 31 ऑगस्टपर्यंत टप्प्याटप्प्याने वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. एल निनो आणि ला निना दोन्हीही होण्याची शक्यता व्यक्त झाल्याने जलसंपदा विभाग सतर्क झाला आहे. या विभागाने अगोदरच पाणी साठ्याचे नियोजन केले आहे. धरणांतील पाणी प्रथम पिण्यासाठी, त्यानंतर शेती व औद्योगिक वापर असे नियोजन आहे.
पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन
दूधगंगा धरणात 31 टक्के पाणीसाठा असून, उर्वरित बहुतांश धरणात 50 टक्क्यांहून अधिक पाणीसाठा आहे. एल निनो आणि ला निनाच्या पार्श्वभूमीवर काटेकोर पाणी नियोजन सुरू असल्याचे कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी सांगितले.