

सुनील कदम
कोल्हापूर : राज्यातील दुष्काळी टापूत गेल्या काही दिवसांपासून खासगी सावकारांच्या टोळधाडी घिरट्या घालताना दिसत आहेत. पाच ते पंधरा टक्क्यांपर्यंत या सावकारांच्या व्याजाचे दर आहेत. प्रामुख्याने दुष्काळामुळे बेजार झालेला शेतकरी, मजूरवर्ग आणि छोटे-मोठे व्यापारी सावकारांचे लक्ष्य ठरत आहेत. सर्वसामान्य नागरिक खासगी सावकाराच्या विळख्यात गुरफटून गेला आहे. प्रशासन सुस्त आणि सावकारी मस्त अशी स्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे.
दुष्काळी टापूत आजकाल खासगी सावकारी फोफावायला त्या त्या भागातील बँका-पतसंस्थांचा कारभारच कारणीभूत ठरत आहे. बहुतेक सहकारी बँका-पतसंस्था स्थानिक राजकारणाचे अड्डे बनले आहेत. त्यामुळे इथले कर्जवाटप राजकारण डोळ्यासमोर ठेवूनच होते. त्यामुळे अनेक गरजूंना कर्ज मिळू शकत नाही. शासकीय बँकांचे निकष इतके कडक आहेत की सर्वसामान्य माणूस ते पूर्णच करू शकत नाही. तशातच गेल्या काही दिवसांपासून दुष्काळी परिस्थितीमुळे बहुतेक सगळ्या सहकारी-बँका पतसंस्थांनी नवीन कर्जवाटप पूर्णपणे बंद केलेले दिसत आहे. त्यामुळे सध्याच्या अडचणीच्या काळात गरजूंना सावकारांकडे हात पसरावा लागतो.
अडचणींचे डोंगर!
सध्या दुष्काळी टापूतील सोयाबीन, भुईमूग, ज्वारी, बाजरी, हायब्रीड, कडधान्ये ही पिके करपून गेली आहेत. इतकेच नव्हे तर ऊस, द्राक्षे व अन्य पिकेही पाण्याअभावी वाळू लागली आहेत. दुष्काळी पट्ट्यातील द्राक्ष पिके तर टँकरच्या पाण्यावर जगवावी लागत आहेत. शासनाने दुष्काळी टापूत विविध सवलती जाहीर करून कर्ज वसुलीही स्थगित केली आहे. पण पिके करपूर गेल्यामुळे दैनंदिन खर्चासाठीही शेतकरी कुटुंबांकडे पैसे नाहीत अशी अवस्था आहे. टँकरच्या पाण्यावर फळपिके जगविणाऱ्यांना त्यासाठी मोठाच खर्च करावा लागत आहे. मजुरांची अवस्था तर अतिशय केविलवाणी झाली आहे. हाताला काम नसल्यामुळे अनेक मजुरांवर आर्थिक संकट कोसळले आहे.
सावकारांसाठी पर्वणी!
दुष्काळी टापूवर ओढवलेले हे अस्मानी संकट खासगी सावकारांसाठी मात्र पर्वणी ठरलेली आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील बहुतेक खासगी सावकारांनी आपला मोर्चा दुष्काळी पट्ट्यात वळविलेला दिसत आहे. गरजू शेतकऱ्यांच्या जमिनीवर किंवा कोऱ्या धनादेशावर कर्ज दिले जात आहे. मजुरांकडे असलेले किडूक-मिडूक दागिने गहान ठेवून सावकार कर्जाची खिरापत वाटताना दिसत आहेत. दुष्काळी पट्ट्यातील अनेक लोक वेगवेगळ्या कारणांनी सावकारीच्या जाळ्यात अडकताना दिसत आहेत. सावकारही गरजवंतांची गरज बघून मासिक पाच ते पंधरा टक्के दराने कर्ज वाटप करताना दिसत आहेत. एकूणच दुष्काळी पट्टा अस्मानी संकटात होरपळत असतानाच सावकारांच्या जोखडालाही जुंपला जात आहे.
भविष्यात भयावह परिणाम!
पश्चिम महाराष्ट्रातील खासगी सावकारीचा इतिहास काळाकुट्ट आहे. शेतकऱ्यांना दिलेले कर्ज त्यांच्या जमिनी बळावूनच वसूल करायचे, ही इथल्या सावकारांची खासियत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी खासगी सावकारांनी बळकावल्याच्या घटना आहेत. हे विचारात घेता दुष्काळाची छाया दूर होईल तेंव्हा इथल्या अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी खासगी सावकारांच्या घशात गेलेल्या असतील, अनेकांच्या घरादारांचा सावकारांनी बाजार केलेला दिसेल, तर अनेक कुटुंबे सावकारी पाशामुळे देशोधडीला लागल्याचे पाहायला मिळेल. त्यामुळे मढ्याच्या टाळूवरचं लोणी खायला सरसावलेल्या सावकारांच्या टोळधाडीला पायबंद घालावाच लागेल. त्यासाठी दुष्काळी टापूत कर्ज देण्यासाठी शासनाने स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची आवश्यकता आहे.