

Shahuwadi Mohini Parit CA exam
सरूड : चरण (ता. शाहूवाडी) येथील मोहिनी महादेव परीट हिने इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (सी.ए.) परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. मे २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. ती कोल्हापूर केंद्रावरून या परीक्षेला सामोरी गेली होती. मोहिनी हिने पहिली ते सातवी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण कोल्हापूर येथील ताराराणी विद्यापीठ, आठवी ते दहावी पद्माराजे गर्ल्स हायस्कुल तसेच महाविद्यालयीन शिक्षण डॉ. रत्नाप्पाआणा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स मधून पूर्ण केले. तिने जिद्द आणि अभ्यासातील सातत्य याच्या जोरावर हे कौतुकास्पद यश मिळविले आहे.
दरम्यान, सी.ए. परीक्षा उत्तीर्ण होणारी चरण गावातील पहिलीच मुलगी आहे. तिचे वडील महादेव हे सहकारी संस्था (पदुम) विभागात प्रमाणित लेखा परीक्षक आहेत. तर आई सरिता गृहिणी आहे. मोहिनीने दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर पुढे जाऊन 'सी.ए.' होण्याचे ध्येय उराशी बाळगले होते. मुळातच अभ्यासात हुशार असल्याने सी ए सारखी खडतर परीक्षा असूनही तिची पूर्व तयारी आणि श्रम पाहता तिच्या यशाबद्दल आम्हाला निश्चित खात्री होती, असा विश्वास व्यक्त करणारे आईवडील आणि भाऊ मोहिनीच्या या यशाने अक्षरशः भारावून गेले आहेत. सद्या परीट कुटुंबीय कोल्हापूर येथील राजोपाध्येनगरात वास्तव्यास आहेत.
'तसं पाहिलं तर मी सीए व्हावं हे वडिलांचं स्वप्न होतं. तेचं माझं पुढे ध्येय बनलं. त्यासाठी कॉलेजची निवड महत्वाची होती. आर्टिकल कालावधीनंतर दररोज १० ते १२ तास अभ्यास आणि कोचिंग क्लासमधील तज्ज्ञांचे मार्गदर्शन, आईवडीलांची साथ यामुळे यश मिळवू शकले. ग्लोबल संधी उपलब्धतेमुळे मुलांनी करिअरसाठी या क्षेत्रात उतरायला हवे.'
- कु. मोहिनी महादेव परीट (यशस्वी सीए परिक्षार्थी)