Uday Samant | मोहन जोशी यांनी नाट्यकला जगभर पोहोचवली

उद्योगमंत्री उदय सामंत यांचे गौरवोद्‌गार; मोहन जोशी यांना केशवराव भोसले स्मृती पुरस्कार प्रदान
कोल्हापूर : ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना संगीतसूर्य  केशवराव भोसले स्मृती पुरस्कार प्रदान करताना उद्योगमंत्री उदय सामंत. सोबत डावीकडून मिलिंद अष्टेकर, ज्योती जोशी, आमदार सतेज पाटील, गिरीश महाजन आदी.
कोल्हापूर : ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार प्रदान करताना उद्योगमंत्री उदय सामंत. सोबत डावीकडून मिलिंद अष्टेकर, ज्योती जोशी, आमदार सतेज पाटील, गिरीश महाजन आदी. (छाया : पप्पू अत्तार)
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : मराठी नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी कलेच्या माध्यमातून मराठी नाट्यकला जगभर पोहोचविण्याचे काम केले आहे. मराठी भाषेप्रति आणि कलेप्रति असलेली त्यांची आत्मियता पाहता मोहन जोशी म्हणजे महाराष्ट्राचा अभिमान असल्याचे गौरवोद्‌गार उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काढले.

अखिल भारतीय नाट्य परिषद कोल्हापूर शाखेच्या वतीने संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना सामंत यांच्या हस्ते सपत्नीक प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. मानचिन्ह आणि ५१ हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. मुलाखतकार राजेश दामले यांनी मोहन जोशी यांची प्रकट मुलाखत घेतली.

आ. सतेज पाटील म्हणाले, कोणताही कलाकार एका दिवसात घडत नसतो. आयुष्यातील विविध अनुभवांतून तो घडत असतो. यावेळी मोहन जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत व प्रास्ताविक गिरीश महाजन यांनी केले. मानपत्र वाचन जितेंद्र देशपांडे यांनी केले. सूत्रसंचालन विश्वराज जोशी यांनी केले. मिलिंद अष्टेकर, ज्योती जोशी, धैर्यशील यादव आदी उपस्थित होते.

गोकुळच्या निमित्ताने कोल्हापूरच्या राजकारणावर बोट

गोकुळच्या भीतीमुळे मंत्री मुश्रीफ कार्यक्रमाला आले नाहीत, असा विनोद करत उदय सामंत यांनी कोल्हापूरच्या राजकारणावर भाष्य केले. निवडणुका आल्या की, कोल्हापुरात पळापळी आणि पळवापळवी सुरू होते. ‘देऊळबंद’नंतर आता ‘गोकुळ’वरही चित्रपट काढायला हवा. यातील कलाकार सगळे गोकुळमध्ये आहेत; मात्र निर्माता बाहेरचा असावा, असा मिश्कील टोलाही त्यांनी लगावला.

दहा लाखांची एफडी

अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या वतीने वर्षभर उत्तम सांस्कृतिक कार्यक्रम व्हावेत, यासाठी आमदार सतेज पाटील यांनी पद्मश्री कै. डी. वाय. पाटील यांच्या नावाने १० लाख रुपयांची एफडी करण्याची घोषणा केली.

‘गोकुळ कुणाचं...’ प्रयोग ११ पासून : सतेज पाटील

आमचाही प्रयोग ११ तारखेपासून सुरू होणार आहे. त्यामध्ये नऊ पात्रे आहेत. तो १९ तारखेपर्यंत चालेल. प्रयोगाचे नाव ‘गोकुळ कुणाचं...’, असे सांगत सतेज पाटील यांनी उपस्थितांमध्ये हशा पिकवला. उदय सामंत हे सामान्यांच्या हृदयात पोहोचणारे मंत्री आहेत; मात्र त्यांचे लक्ष फक्त रत्नागिरीत असते, असा टोलाही त्यांनी लगावला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news