कोल्हापूर : गेल्या अडीच वर्षांच्या राजकारणाला कंटाळलेली जनता मतदानाची वाट पाहात होती. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला किमान 180 जागा मिळतील. महायुती सरकारला कधी एकदा घरी बसवतोय याची जनता वाट पाहात आहे, असे विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आ. सतेज पाटील यांनी बुधवारी सकाळी माध्यमांशी बोलताना सांगितले.
आ. पाटील यांनी सकाळी कसबा बावडा येथील महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रातील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. ते म्हणाले, राज्यात परिवर्तन निश्चित आहे, महायुतीचे सरकार जाऊन महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. जिल्ह्यात 25 ते 30 लाख मतदार मतदान करणार आहेत. त्या सर्वांच्या वतीने महाडिक एकटे मतदान करणार नाहीत, हे बोलणार्यांनी लक्षात घेतले पाहिजे होते. फोडाफोडीचे राजकारण करण्यात आले. महिलांचा अवमान करणारे वक्तव्य भाजपकडून केली जातात. राज्यात राज्यपाल राजवट आणायची आणि खेळ करत बसायचा असा डाव भाजपचा आहे.
गेल्या दोन-तीन आठवड्यापासून प्रचारासाठी पायाला भिंगरी बांधलेल्या कार्यकर्त्यांनी आपापल्या बूथवरील शेवटचे मतदान झाल्यानंतर आ. सतेज पाटील यांना भेटण्यासाठी धैर्यप्रसाद हॉलमध्ये मोठी गर्दी केली होती. यावेळी आ. पाटील यांनी सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानत तुम्हीच माझी ताकद असल्याचे सांगताच कार्यकर्त्यांनी शिट्ट्या वाजवून आणि घोषणांनी दिलेल्या प्रतिसादामुळे हॉलचा परिसर दणाणून गेला. कार्यकर्त्यांच्या या प्रेमाने आ. पाटीलही भारावून गेले.
भाजप नेते विनोद तावडे पैसे वाटप करताना सापडल्याबाबत बोलताना आ. पाटील म्हणाले, महायुतीचे सरकार खोकेवाले सरकार आहे. पैशाच्या ताकदीवर मते विकत घेण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. मात्र पैसे घेऊन उद्याची महागाई, बेरोजगारी अंगावर घ्यायची नाही. राज्यातील जनता हे सहन करणार नाही. महाराष्ट्राची वाईट प्रतिमा देश पातळीवर झाली आहे, हे मान झुकवणारे आहे.