

कोल्हापूर : हैदराबाद येथील ‘भारत समिट’ या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये आमदार सतेज पाटील यांनी सहभाग घेतला. या समिटमध्ये झालेल्या विचारांची देवाण-घेवाण भविष्यात अधिक न्याय्य, समताधिष्ठित आणि शांततापूर्ण जगाच्या निर्मितीसाठी निश्चितच दिशादर्शक ठरेल, असा विश्वास आ. पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
तेलंगणा राज्य शासनाने आ. पाटील यांना विशेष निमंत्रित केले होते. ‘न्याय, समता आणि जागतिक सहकार्याच्या नव्या दिशेचा शोध’ असा विषय या परिषदेत घेण्यात आला. काँग्रेसचे प्रभारी सिरीवेल्ला प्रसाद आणि युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब यांच्यासह ते सहभागी झाले. या समिटमध्ये भारताच्या नव्या जागतिक व्यवस्थेतील भूमिकेवर आयोजित विशेष सत्रात आ. पाटील यांनी सहभाग नोंदवला.
या आंतरराष्ट्रीय परिषदेत युवा नेत्यांची बैठक, परदेशस्थ भारतीयांशी संस्थात्मक स्तरावर संपर्क व समन्वय प्रस्थापित करणे या उच्चस्तरीय चर्चासत्रांमध्ये प्रमुख वक्ता म्हणून त्यांनी आपली भूमिका मांडत विविध विषयांवर विचारांची देवाणघेवाण केली. युवकांचे नेतृत्व, जागतिक स्तरावरील भारतीय समुदायाशी संस्थात्मक संबंध अधिक दृढ करणे आणि राज्याच्या विकासासाठी गुंतवणुकीच्या नव्या संधी निर्माण करणे, या विषयांवर या चर्चासत्रांत विचारमंथन झाले. या महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय विचारमंथनाचा भाग होता आले, याचा विशेष आनंद असल्याचे आ. पाटील यांनी सांगितले.