

कोल्हापूर : गोकुळला मल्टिस्टेट करून दूध संस्थांचे महत्त्व कमी करणे, तुमच्या मालकीचे टँकर, पॅकिंगचा ठेका यासह अनेक कारनाम्यांच्या भ्रष्टाचारी कारभाराला कंटाळूनच गेल्या निवडणुकीत दूध उत्पादकांनी सत्तांतर केले, असा टोला लगावत जनतेने लोकसभा निवडणुकीत पराभवाचा दणका देताना दिलेल्या पावणेतीन लाखांच्या जखमा त्यांनी विसरू नयेत. गोकुळच्या निवडणुकीत स्वाभिमानी सभासद पराभवाचा दणका देतील, असा पलटवार विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी खासदार धनंजय महाडिक यांच्यावर प्रसिध्दी पत्रकाद्वारे केला.
पत्रकात म्हटले आहे, आजपर्यंत प्रत्येक निवडणुकीत स्वाभिमानी जनतेच्या जीवावर संघर्ष करून दखल घेण्याइतपत यश मिळवले आहे. याउलट प्रत्येक निवडणुकीत दुसऱ्याच्या जीवावर मोठ्या बहुमताची भाषा करणाऱ्या खा. महाडिक यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर आता किती नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य निवडून आणले? महापालिका निवडणुकीत सतेज पाटील यांच्या पाच ते सात जागा निवडून येतील, अशी दर्पोक्ती केली. पण, महायुतीतील झाडून सारे नेते एका बाजूला असताना ३४ नगरसेवक निवडून आणून ताकद दाखवली, हे ध्यानात घ्या. स्वतः कर्तृत्वशून्य असताना दुसऱ्याची मापे काढण्याचा उद्योग बंद करा.
तुमची सत्ता असताना मुख्यमंत्र्यांकडून कधीही राजकीय हस्तक्षेप झाला नाही, असे आपण म्हटले होते. याचा अर्थ तुमचा कारभार चोख होता, त्याला माझ्याकडून ना-हरकत प्रमाणपत्र मिळाले आहे, असे समजू नका. तुम्ही कधी स्वतः संस्था काढत नाही, तर दुसऱ्यांनी काढलेल्या संस्था बळकवतात, हा इतिहास माहीत आहे. गोकुळच्या निवडणुकीत अजून पुलाखालून बरेचसे पाणी वाहून जायचे आहे. त्यामुळे आगे आगे देखो होता है क्या, असा इशारा त्यांनी दिला.
राजाराम कारखान्यावरील कर्जाच्या व्याजाचे काय?
रडीचा डाव खेळून सत्ता मिळवलेल्या राजाराम कारखान्यावर ३५६ कोटींचे कर्ज असताना या हंगामात उसाचे एकही कांडे गाळप झाले नाही. उलट या कर्जाच्या व्याजाचा बोजा सभासदांच्या अंगावर पडला, याची जबाबदारी खासदारांनी घ्यावी. भीमा कारखान्यातही सभासदांची ३० कोटींची देणी थकविल्याबद्दल साखर आयुक्तालयाने मालमत्ता जप्तीची नोटीस काढली. या कारखान्यावरही असलेल्या कर्जाच्या व्याजाचे काय? असा सवालही आ. पाटील यांनी केला.