

कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्गाला विरोध झाल्यानंतर राज्य सरकारने निवडणुकीत कोल्हापूरपुरती अधिसूचना रद्द केली, ती वाटली, त्याचा उत्सव साजरा केला. आता मात्र, रेखांकन बदलून कोल्हापुरातून महामार्ग करणार हे अधिसूचनेत स्पष्ट केले आहे. त्यामुळे सरकारने कोल्हापूरकरांची घोर फसवणूक करून पाठीत खंजीर खुपसला असल्याचा आरोप काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केला. याविरोधातील लढा तीव्र करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
पाटील म्हणाले, शक्तिपीठ महामार्गाबद्दलचा अध्यादेश शासनाने गुरुवारी काढला आहे. त्याचा निषेध करतो. महायुतीच्या नेत्यांनी, आमदारांनी निवडणुकीच्या आधी महामार्ग रद्द करणार असा शब्द दिला होता. त्यांनीही शब्द फिरवल्याचे आज सिद्ध झाले आहे. कोल्हापुरापुरता महामार्ग रद्द केला होता ती अधिसूचना या अध्यादेशाद्वारे रद्द केली आहे. म्हणजे कोल्हापुरातून महामार्ग होणार हे या अध्यादेशाद्वारे स्पष्ट झाले आहे. शासन आधीच आर्थिक अडचणीत आहे.
लाखो कोटी रुपयांची बिले दिलेली नाहीत. सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार होईल की नाही अशी साशंकता आहे. त्यामुळे आम्ही शांत बसणार नाही, शक्तीपीठ महामार्गा विरोधात तीव्र आंदोलन करु असेही त्यांनी असेही ते म्हणाले.