

कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघामध्ये शासननियुक्त संचालक आणून त्यांना मतदानाचा अधिकार देण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. स्थानिक स्वराज्य संस्था बहुमताने चालल्या पाहिजेत. बहुमताचा कौल डावलून अशा संस्था मोडून काढणे योग्य नाही, असे सांगत जिल्ह्यातील साडेपाच लाख शेतकर्यांनी दिलेल्या कौलाचा महायुतीकडून अनादर होत असल्याचा आरोप आमदार सतेज पाटील यांनी पत्रकाद्वारे केला.
‘गोकुळ’मध्ये सध्या १३ संचालक समविचारी आघाडीच्या बाजूने असून, हाच बहुमताचा कौल आहे. त्यामुळे जनतेने दिलेला कौल स्वीकारला पाहिजे. महायुतीचे १२ संचालक आहेत. त्यांनी अध्यक्ष निवडीच्या सभेला उपस्थित राहून अध्यक्ष निवडीस सहकार्य करावे, असे आवाहनही आ. पाटील यांनी या पत्रकात केले. शासननियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार दिल्यास जिल्हा मध्यवर्ती बँका, महानगरपालिका, जिल्हा परिषदांमधील स्वीकृत सदस्यांनाही मतदानाचा अधिकार द्यावा लागेल. त्यामुळे हा निर्णय योग्य ठरणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
निवडणुकीत मिळालेल्या बहुमताच्या जोरावर शशिकांत पाटील-चुयेकर हेच अध्यक्ष होतील, असा विश्वास व्यक्त करत शासननियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार देण्याबाबत बुधवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत काय निर्णय होतो, हे माहिती नाही. मात्र, असा निर्णय होऊ नये, यासाठी आपला प्रयत्न आहे. प्रशासकीय काळात तोटा वाढत असताना आणि दुष्काळासह चाऱ्याच्या प्रश्नाला शेतकरी सामोरे जात असताना निर्णय घेणारे लोकनियुक्त मंडळच ‘गोकुळ’मध्ये अस्तित्वात नसणे लाजिरवाणे आहे. आम्ही कायदा आणि लोकशाहीच्या मार्गाने लढत राहणार आहोत. विरोधी संचालकांनी शेतकऱ्यांचा कौल स्वीकारून पुढील सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन आ. पाटील यांनी केले.