

कोल्हापूर : महापालिकेची सत्ता तीस वर्षे तुमच्याकडे होती. मग शहरात विकासकामे का केली नाहीत? रस्त्यांची काय अवस्था होती? रंकाळ्याची परिस्थिती काय होती? इतकी वर्षे तुम्ही नेमके झोपा काढत होता काय? अशा बोचऱ्या सवालांची सरबत्ती करत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. निधी मिळत नसल्याच्या विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना त्यांनी विकासकामे चांगली असतील तर विरोधकांनाही निधी दिला जाईल. मात्र विनाकारण नकारात्मक वातावरण निर्माण करणे बंद करा, असा इशारा दिला.
महापालिकेत विविध विकासकामांच्या आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. आ. क्षीरसागर म्हणाले, महापालिकेत सध्या महायुतीची सत्ता आहे. ठरावीक आणि ऐच्छिक निधी सर्वांना समान दिला जातो. त्यापलीकडील निधीसाठी नगरसेवकांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून कामाची गरज पटवून देणे आवश्यक आहे. जिथे कामाची आवश्यकता आहे, तिथे निधी दिला जातो. सत्ताधाऱ्यांना वाटेल तिथेच निधी खर्च केला जाईल, असे नाही. विरोधकांची कामे चांगली असतील तर त्यांनाही मुद्दाम विरोध केला जाणार नाही. मात्र, सतत निधी मिळत नसल्याची ओरड करणाऱ्या विरोधकांनी तीस वर्षांच्या सत्ताकाळात काय केले, याचे आत्मपरीक्षण करावे. रस्ते, रंकाळ्याची स्थिती यावरून त्यांनी विरोधकांना लक्ष्य केले. कन्व्हेन्शन सेंटरसाठी ३०० कोटींचा निधी आणि ३२०० कोटींचा पूर्ण नियंत्रण प्रकल्प आम्ही आणला, असे सांगत त्यांनी महायुतीच्या विकासकामांचा दाखला दिला. पेड सोशल मीडियावरही त्यांनी टीका केली. काम करणाऱ्यांना रडत बसणे आवडत नाही. विरोधकांनी निगेटिव्ह नॅरेटिव्ह सेट करण्याचा पायंडा बंद करावा, असे आवाहन आ. क्षीरसागर यांनी केले.
दरम्यान, दूध दरवाढीचे समर्थन करताना दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचाही विचार झाला पाहिजे, असे आ. क्षीरसागर यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील दहा आमदार, महापालिका आणि जिल्हा परिषदेत महायुतीला मिळालेली सत्ता हा जनतेच्या विश्वासाचा कौल असल्याचे सांगत विरोधकांनीही जनतेच्या या निर्णयाचा विचार करावा, असे त्यांनी सुनावले.
महापालिका प्रशासनाच्या कामकाजावर नाराजी
महापालिका प्रशासनाच्या कामकाजावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. तीन पालकमंत्र्यांनी बैठका घेऊन सूचना केल्या, दीड वर्षापासून सातत्याने आढावा घेतला जात आहे. तरीही कामे होत नसतील तर आता अधिकाऱ्यांविरोधात कठोर निर्णय घ्यावे लागतील, असा इशारा त्यांनी दिला. बोगस व बेकायदेशीर कामे, वाढीव इस्टिमेट तयार करण्याचे प्रकार निदर्शनास येत असून वारंवार सूचना देऊनही काही अधिकारी सुधारत नसल्याबद्दल आ. क्षीरसागर यांनी संताप व्यक्त केला.