Rajesh Kshirsagar | डॉ. स्मिता जाधव यांना मताधिक्य देऊ : आ. राजेश क्षीरसागर

पुणे पदवीधरमध्ये महायुतीचा विजय निश्चित
कोल्हापूर : डॉ. स्मिता जाधव यांच्या प्रचारार्थ शिवसेनेच्या वतीने आयोजित मेळाव्यात बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर. दुसऱ्या छायाचित्रात मेळाव्यास झालेली गर्दी.
कोल्हापूर : डॉ. स्मिता जाधव यांच्या प्रचारार्थ शिवसेनेच्या वतीने आयोजित मेळाव्यात बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर. दुसऱ्या छायाचित्रात मेळाव्यास झालेली गर्दी. (छाया : पप्पू अत्तार)
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिकांनी एकजुटीने कामाला लागावे. पदवीधर मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचत, मतदान केंद्रनिहाय नियोजन करून डॉ. स्मिता जाधव यांच्या विजयाचा गुलाल उधळण्यासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले.

डॉ. स्मिता जाधव यांच्या प्रचारार्थ आयोजित शिवसेना पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आगामी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या पदाधिकारी व शिवसैनिकांना विविध सूचना देण्यात आल्या. तसेच डॉ. स्मिता जाधव यांच्या विजयासाठी बूथनिहाय प्रचार यंत्रणा सक्रिय करण्याचा निर्धार करण्यात आला.

आ. क्षीरसागर म्हणाले, पदवीधर मतदारांच्या विविध प्रश्नांची जाण असलेले आणि ते प्रश्न सक्षमपणे सोडविण्याची क्षमता असलेले उच्चशिक्षित नेतृत्व म्हणून डॉ. स्मिता जाधव या महायुतीच्या योग्य उमेदवार आहेत. त्यांच्या माध्यमातून पदवीधरांच्या अपेक्षा विधिमंडळात प्रभावीपणे मांडल्या जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यापूर्वी झालेल्या तीन निवडणुकांमध्ये बूथनिहाय जबाबदाऱ्या शिवसैनिकांनी प्रभावीपणे पार पाडल्या आहेत. त्यामुळे यंदाही प्रत्येक मतदान केंद्रावर सक्षम यंत्रणा उभी करून मतदारांशी थेट संपर्क साधावा. शिवसैनिकाने 'रात्रंदिवस एक करून' पदवीधर मतदारांपर्यंत पोहोचावे, असे आवाहन क्षीरसागर यांनी केले.

डॉ. स्मिता जाधव या कोल्हापूरच्या सूनबाई आणि नात असून सामाजिक कार्याची मोठी परंपरा असलेल्या जाधव कुटुंबाचा वारसा त्या पुढे नेत आहेत. पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव आणि स्वर्गीय डॉ. डी. वाय. पाटील यांच्या सामाजिक कार्याचा वसा घेत समाजहितासाठी त्या कार्यरत आहेत. त्यांच्या रूपाने जाणकार, उच्चशिक्षित आणि सामाजिक भान असलेले नेतृत्व विधिमंडळात पाठविण्यासाठी शिवसैनिक कोणतीही कसर सोडणार नाहीत, असा विश्वास आ. क्षीरसागर यांनी व्यक्त केला.

यावेळी माजी आ. जयश्री जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शिवसेना गटनेता शारंगधर देशमुख, शिवाजी जाधव, महिला आघाडी जिल्हाप्रमुख शुभांगी पोवार, किशोर घाटगे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक अंकुश निपाणीकर यांनी केले. महिला व बालकल्याण सभापती कौसर बागवान, शिक्षण समिती सभापती शीला सौनुले, नगरसेविका मंगल साळोखे, अनुराधा खेडकर, प्राजक्ता जाधव, नगरसेवक अजय इंगवले, प्रसाद चव्हाण, स्वरूप कदम, अभिजित खतकर, रमेश खाडे, तुकाराम साळोखे, दीपक चव्हाण, कमलाकर जगदाळे, हर्षल सुर्वे, पवित्रा रांगणेकर, अमरजा पाटील यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक, युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

समाजहिताच्या कामात जाधव कुटुंबीयांचे योगदान अतुलनीय : आमदार क्षीरसागर

जाधव कुटुंबीयांनी विविध सामाजिक आणि जनहिताच्या उपक्रमांमध्ये सातत्याने भरीव योगदान दिले आहे. देशाच्या संरक्षणार्थ सीमेवर कार्यरत असलेल्या सैनिकांसाठी आरोग्यसेवेच्या माध्यमातून मदत करण्यापासून ते पूरबाधित नागरिकांना दिलासा देणे, कोव्हिड काळात आरोग्यविषयक सेवा उपलब्ध करून देणे तसेच विविध सामाजिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी डॉ. प्रतापसिंह जाधव, डॉ. योगेश जाधव आणि डॉ. स्मिता जाधव यांनी सातत्याने काम केले आहे. जाधव कुटुंबीयांचे समाजहिताच्या कार्यातील योगदान अतुलनीय असून, या कार्याची पोहोचपावती पदवीधर मतदार मतदानाच्या माध्यमातून देतील. डॉ. स्मिता जाधव यांच्या सामाजिक कार्याला आणि सक्षम नेतृत्वाला मतदारांचा आशीर्वाद मिळून त्यांचा विजय निश्चित होईल, असा विश्वास आ. क्षीरसागर यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news