

कोल्हापूर : कोल्हापुरात शासकीय विधी महाविद्यालय सुरू करावे, अशी मागणी आमदार अमल महाडिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे नागपूर अधिवेशनावेळी केली.
कोल्हापूर शहरात नुकतेच उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कार्यान्वित झाले आहे. कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सोलापूर जिल्ह्यातील अनेक खटले सर्किट बेंचच्या माध्यमातून मार्गी लागत आहेत. सर्किट बेंचसाठी नूतन इमारत शेंडा पार्क परिसरात होणार आहे. लवकरच उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर विधी क्षेत्रात तरुणांना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होणार आहे.
जिल्ह्यात दोन खासगी विधी महाविद्यालये कार्यरत आहेत. कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मर्यादित आहे. भविष्यातील संधींचा विचार करता कोल्हापूरमध्ये शासकीय विधी महाविद्यालय सुरू होणे गरजेचे आहे. त्यामुळे शासकीय विधी महाविद्यालय सुरू करून सर्वसामान्य कुटुंबांतील विद्यार्थ्यांची सोय करावी. लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.