

आशिष आडिवरेकर
कोल्हापूर : घरातील एखादी व्यक्ती बेपत्ता झाल्यास २४ तास थांबा... तुम्ही शोध घ्या... परत येईल, असा सल्ला पोलिसांकडून नातेवाईकांना दिला जायचा. आता मात्र बेपत्ता व्यक्तीची मिसिंग म्हणून नोंद घेणे थांबणार असून, तत्काळ अपहरणाचा गुन्हा दाखल करून त्या व्यक्तीचा शोध घेणे बंधनकारक झाले आहे. यामुळे बेपत्तांचा शोध घेऊन त्यांना सुखरूप परत आणणे शक्य होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने एका खटल्याच्या निकालावेळी बेपत्तांच्या शोधासाठी मार्गदर्शक तत्त्वे लागू केली आहेत. याची अंमलबजावणी करण्याचे आदेश गृह खात्याने पोलिस प्रशासनास दिले आहेत. यामुळे घरातील व्यक्ती बेपत्ता झाल्यास २४ तास वाट पाहणे बंद होणार आहे.
हा आहे नवीन बदल
२०१४ पासून ० ते १८ वयोगटातील मुले-मुली बेपत्ता झाल्यास तत्काळ अपहरणाचा गुन्हा नोंद होत होता. मात्र इतर वयोगटातील महिला, पुरुष बेपत्ता होण्याचे प्रमाण चिंताजनक असल्यामुळे आता वयोगटाची मर्यादा रद्द करून बेपत्ता होणाऱ्या सर्वांच्या अपहरणाचा गुन्हा नोंद करून त्याचा तपास करणे बंधनकारक झाले आहे.
‘गोल्डन अवर्स’मध्ये शोध गरजेचे
बेपत्ता व्यक्तीच्या शोधासाठी पहिले २४ तास (गोल्डन अवर्स) महत्त्वाचे असतात. यात तत्काळ पावले उचलल्यामुळे व्यक्ती सुरक्षित सापडू शकते. यामुळे जीवितहानी टळू शकते. गुन्हा दाखल करण्याच्या सक्तीमुळे पोलिसांना या गोल्डन अवर्समध्येच शोध घेणे आता बंधनकारक राहील .
* बेपत्ता व्यक्ती २४ तासांत परत आल्यास त्या गुन्ह्याची निर्गतही तत्काळ केली जाईल. संबंधित गुन्हा न्यायालयाकडे न पाठविता पोलिस अधीक्षकांच्या पातळीवर या गुन्ह्याची निर्गती होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गृह विभागाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. यानुसार कोल्हापूर पोलिस दलातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना मिसिंग प्रकरणांत किडनॅपिंग प्रमाणेच गुन्हा दाखल करून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. असा गुन्हा दाखल न केल्यास कडक कारवाई होईल.
नीलोत्पल, पोलिस अधीक्षक