

गडहिंग्लज ः हरळी येथील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्यात (गोडसाखर) डिस्टिलरी विस्तार, जुना गिअर बॉक्स खरेदी, बॉयलर मॉडिफिकेशन, टर्बाईन खरेदी, तोडणी व वाहतूक अॅडव्हान्स यात 29 कोटी 58 लाख 32 हजार रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका लेखापरीक्षक सुशांत फडणीस यांनी ठेवला. याप्रकरणी गडहिंग्लज पोलिस ठाण्यात तत्कालीन अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापूरकर यांच्यासह 21 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात तत्कालीन तीन कार्यकारी संचालक, मुख्य लेखापाल, मुख्य शेती अधिकारी, सचिव व 13 कंत्राटदार यांचा समावेश आहे. पोलिसांनी याप्रकरणी काहीजणांना ताब्यात घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत. यामुळे सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, सन 2023-24 च्या कारखान्याच्या लेखापरीक्षणात तत्कालीन अध्यक्ष डॉ. शहापूरकर यांनी अधिकाराचा गैरवापर करीत आर्थिक व प्रशासकीय अनियमितता केली आहे. यात 11 कोटी 42 लाख 64 हजार रकमेसाठी डॉ. शहापूरकर जबाबदार आहेत, तर अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेल्या अप्रशासकीय कामामुळे कारखान्याला 18 कोटी 29 लाख 16 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे एकूण 29 कोटी 58 लाख 32 हजार रुपये गैरव्यवहाराला शहापूरकर यांच्यासह 21 जण जबाबदार आहेत.
डॉ. शहापूरकर यांनी साखर आयुक्तांची पूर्वपरवानगी न घेता बेकायदेशीररीत्या डिस्टिलरी विस्तार केला असून, यात 2 कोटी 38 लाख 76 हजार रुपये अॅडव्हान्स दिला. मंजुरीविना 4 कोटी रुपये अॅडव्हान्स अन्य एका कंपनीला दिले. याबाबतची कोणतीही कागदपत्रे कारखान्याकडे उपलब्ध नाहीत. याच कामात 1 कोटी 62 लाख रुपये किमतीच्या मशिनरी कारखान्यात आल्या असल्या, तरी एक वर्ष त्यांचा वापर झालेला नाही. चार गिअर बॉक्स खरेदी केले असून, त्यांची किंमत 2 कोटी 24 लाख 23 हजार रुपये आहे. यालाही साखर आयुक्तांची पूर्वपरवानगी घेतलेली नाही. हे गिअर बॉक्स जुने असून, त्यांना रंगरंगोटी करून त्यांची किंमत नवीन गिअर बॉक्सप्रमाणे दर्शविली आहे.
बॉयलर मॉडिफिकेशनसाठीही बॉयलर निरीक्षकांची परवानगी नसतानाही कामाची ऑर्डर दिली. 75 दिवसांत काम पूर्ण होणे अपेक्षित असताना, तसा कोणताही जमा-खर्च कारखान्याकडे दिसत नाही. त्यामुळे यात 4 कोटी 46 लाख 13 हजार रुपये अॅडव्हान्स नियमांचे उल्लंघन करून दिला आहे. 33 वर्षे जुनी टर्बाईन 49 लाख 56 हजारांना खरेदी केली आहे. या टर्बाईनवर दुरुस्तीसाठी 85 लाख 75 हजार रुपये खर्च दाखविला आहे. सध्या कारखान्यात ते वापरलेले नाही. यात 1 कोटी 35 लाख 31 हजार रुपये अपहार झाला आहे. तोडणी व वाहतूक अॅडव्हान्समध्ये 13 कंत्राटदारांत 98 लाख 21 हजार रक्कम दिली असली, तरी कारखाना दप्तरी अपूर्ण नोंदी आहेत. यापैकी एकानेही हे काम केले नसून, डॉ. शहापूरकरांच्या आदेशाने कागदपत्रांची पूर्तता न करताच अॅडव्हान्स रक्कम दिल्याचे दाखवले आहे. याशिवाय डॉ. शहापूरकर यांनी अधिकाराचा गैरवापर करून कारखाना विस्तारीकरण, आधुनिकीकरण व इतर खरेदीत मंजुरीशिवाय व्यवहार केल्यामुळे यंत्रसामग्री, तोडणी-वाहतूक अॅडव्हान्स यात कारखान्याचे नुकसान केले आहे.