

कोल्हापूर : कोल्हापूर आणि मिरजदरम्यानच्या रेल्वे वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी मिरज रेल्वेस्थानकात कॉर्ड लाईन प्रकल्पाला मान्यता मिळाली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी 128 कोटी 78 लाख रुपयांच्या या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. यामुळे कोल्हापूर-पंढरपूर आणि लोंढा मार्गावरील रेल्वे वाहतूक अधिक कार्यक्षम होऊन प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे.
मिरज जंक्शन येथून विविध मार्गांवर रेल्वेगाड्या धावतात, त्यात मिरज-पुणे, मिरज-कोल्हापूर, मिरज-लोंढा, मिरज-पंढरपूर यांचा समावेश आहे. मात्र, कोल्हापूर-लोंढा आणि कोल्हापूर-पंढरपूर मार्गावर ये-जा करणार्या गाड्यांना मिरज स्थानकात इंजिन बदलावे लागते. ज्यामुळे प्रत्येक गाडीला सरासरी 120 मिनिटे विलंब होतो. कॉर्ड लाईन उभारल्यानंतर, मिरज स्थानकात गाडीचे इंजिन बदलणे आवश्यक राहणार नाही. यामुळे गाड्यांचे इंजिन बदलणे, स्थानकात प्रवेश करणे आणि पुन्हा बाहेर येणे यासाठी लागणारा वेळ वाचणार आहे आणि गाड्यांची कार्यक्षमता वाढणार आहे. या प्रकल्पामुळे पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे पायाभूत सुविधांची सुधारणा होईल, तसेच मालवाहतूक आणि प्रवासी गाड्यांचे कार्यक्षमतेने संचालन होईल. प्रवाशांची मिरज ते कोल्हापूर जलद प्रवासाची मागणी या प्रकल्पामुळे द़ृष्टिक्षेपात येणार आहे.