

कोल्हापूर : एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीचे अपहरण, लग्नाला नकार देताच मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी टिंबर मार्केट येथील सुहास ऊर्फ पप्पू आनंदा कांबळे ( वय 35, रा. गवत मंडई, कोल्हापूर) याला न्यायालयाने 3 वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती आर. व्ही. आदोने यांनी गुरुवारी खटल्याचा निकाल दिला.
क्रशर चौक येथील खणीजवळ दि. 20 फेब्रुवारी 2014 मध्ये ही घटना घडली होती. सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील अमिता कुलकर्णी यांनी काम पाहिले. पीडित मुलीचे आई, वडील मयत झाले आहेत. आत्या मुलीचा सांभाळ करतात. आरोपी कांबळे विवाहित आहे.
आरोपी पीडित मुलीवर एकतर्फी प्रेम करत होता. 20 फेब्रुवारी 2014 रोजी मुलगी मैत्रिणीला भेटण्यासाठी जात असताना आरोपीने तिचा पाठलाग करून तिला गाठले. दुचाकीवर बसण्यासाठी त्याने तगादा लावला. मुलीने नकार देताच त्याने मुलीला जिवे मारण्याची धमकी दिली. भेदरलेल्या मुलीला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून त्याने संभाजीनगर येथील पेट्रोलपंपाजवळ आणले, तेथे रिक्षाने रेल्वे स्थानकावर नेले. तेथून सातारा व पुन्हा बेळगावला नेऊन मित्र रमजान याच्या ओळखीतून तिला घटप्रभाजवळ पागलदेणी गावातील मंजुनाथ नावाच्या व्यक्तीच्या घरात आठ ते दहा दिवस कोंडून ठेवले. लग्नास नकार देताच आरोपीने मुलीला मारहाण करून तिचा छळ केला.
या घटनेनंतर पीडितेच्या आतीने जुना राजवाडा पोलिस ठाण्यात धाव घेऊन सुहास कांबळे विरुद्ध फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपीला अटक करून मुलीची सुटका केली. न्यायालयात दोषारोप दाखल करण्यात आले. विशेष सरकारी वकील अमिता कुलकर्णी यांनी 12 साक्षीदार तपासले. विशेष सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरविले. तीन वर्षे कारावास, दहा हजार रुपयांचा दंड, दंड न दिल्यास चार महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावण्यात आली.