

कोल्हापूर : 13 वर्षीय शाळकरी मुलीच्या असहाय्यतेचा फायदा घेत लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी महापालिका आरोग्य विभागातील सफाई कामगार चेतन प्रदीप नरवाळे (वय 34, रा. कामगार चाळ, संभाजीनगर, कोल्हापूर) याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती कविता अग्रवाल यांनी बुधवारी दोषी ठरविले. नराधमाला 20 वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दि.25 सप्टेंबर 2021 चे पूर्वी 6 ते 8 महिन्यांपूर्वी नराधमाने वेळोवेळी मुलीवर अत्याचार केला होता.
चेतन नरवाळे व पीडित मुलीचे कुटुंब एकमेकांचे ओळखीचे होते. ओळखीमुळे पीडिताचे नरवाळेच्या घरी येणे-जाणे होते. आरोपीची पत्नी मुलीला घरातील कामे करण्यास सांगत. ओळखीचा फायदा घेत आरोपीने मुलीला घरी बोलावून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतरही 7 ते 8 वेळा पीडितेवर अत्याचार केला.
पीडितेने अत्याचाराबद्दल जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता, नरवाळे याने झालेला प्रकार कोणाला सांगितल्यास तुझ्यासह घरच्या मंडळींना ठार मारण्याची धमकी दिल्याने भेदरलेल्या मुलीने हा प्रकार आई, वडिलासह नातेवाईकांना सांगितला नाही. मुलीच्या असहाय्यतेचा फायदा घेत चेतन नरवाळेचा मित्र आदित्य घावरेनेही कामगार चाळजवळील हॉलजवळ पीडितेवर अत्याचार केला.
दि. 25 सप्टेंबर 2021 सकाळी पीडित मुलगी बाथरूममध्ये प्रसूत झाली. तिने मुलीस जन्म दिला. मात्र त्याचवेळी अर्भकाचा मृत्यू झाला. मुलीची आई व अन्य नातेवाईकांनी विश्वासात घेऊन मुलीकडे चौकशी केली असता, हा प्रकार चव्हाट्यावर आला. पीडित मुलीच्या आईने जुना राजवाडा पोलिस ठाण्यात नराधम चेतन नरवाळे, त्याचा मित्र आदित्य घावरे याच्याविरुद्ध फिर्याद दिली. राजवाडा पोलिसांनी नराधमांना अटक करून त्यांच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांच्यासमोर खटल्याची सुनावणी झाली. सरकारमार्फत सहायक सरकारी वकील अॅड. शीतल रोटे यांनी काम पाहिले. खटल्यात सहायक सरकारी वकील रोटे यांनी केलेला युक्तिवाद, वरिष्ठ न्यायालयातील न्यायनिवाडे, प्रत्यक्ष दाखल पुरावा ग्राह्य धरून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अग्रवाल यांनी आरोपी चेतन नरवाळे यास दोषी ठरवून त्यास 20 वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
दंड न भरल्यास एक महिना साधी कैद सुनावण्यात आली. आदित्य घावरे याची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.