kolhapur | मंत्री भरणे, बाबासाहेब पाटील, आदिती तटकरेंकडून पाटील कुटुंबीयांचे सांत्वन

कोल्‍हापूर : पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्‍या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी अभिवादन केले. यावेळी आ. सतेज पाटील यांच्यासह इतर मान्यवर. २) कृषिमंत्री दत्तात्रय भरणे. ३) महिला व बालकल्‍याणमंत्री आदिती तटकरे यांनीही अभिवादन केले.
कोल्‍हापूर : पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्‍या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी अभिवादन केले. यावेळी आ. सतेज पाटील यांच्यासह इतर मान्यवर. २) कृषिमंत्री दत्तात्रय भरणे. ३) महिला व बालकल्‍याणमंत्री आदिती तटकरे यांनीही अभिवादन केले. (छाया : पप्‍पू अत्तार)
Published on
Updated on

कोल्हापूर : राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे आणि सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी गुरुवारी डॉ. डी. वाय. पाटील कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्‍यांनी डॉ. डी. वाय. पाटील यांच्‍या प्रतिमेस पुष्‍पांजली वाहिली.

राजकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक, शैक्षणिक आणि कृषी क्षेत्रातही डॉ. डी. वाय. पाटील यांचे योगदान अतुलनीय होते. शेतीवरील विशेष प्रेमामुळे ते शेवटपर्यंत बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत होते. त्यां‍च्या निधनाने राज्याचे मोठे नुकसान झाले आहे, अशा शब्दांत मंत्री भरणे यांनी भावना व्यक्त केल्या. मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, डॉ. डी. वाय. पाटील यांनी सात दशकांहून अधिक काळ शिक्षण क्षेत्रात दिलेले योगदान अजरामर आहे. त्यांच्या कार्याचा लाभ तीन-चार पिढ्यांनी घेतला असून, त्यांच्या जाण्याने शिक्षण क्षेत्रात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. शिक्षण, सामाजिक, वैद्यकीय आणि सार्वजनिक क्षेत्रात त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे.

मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले, डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने देशासह राज्यात पोकळी निर्माण झाली आहे. जीवनात एखादी व्यक्ती किती काम करू शकते, त्याचे उदाहरण म्हणून त्यांचे नाव घेता येईल. ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराच्या संधीसोबतच आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या. यावेळी डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष संजय डी. पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, आ. सतेज पाटील, आ. विश्वजित कदम, आ. मिलिंद नार्वेकर, आ. अभिमन्यू पवार, आ. विवेक कोल्हे, माजी आमदार ऋतुराज पाटील, क्षितिज ठाकूर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील, नगरसेवक आदिल फरास उपस्थित होते.

दरम्यान, आ. बाबासाहेब देशमुख, आ. सुधीर गाडगीळ, आ. रोहित आर. आर. पाटील, आ. इंद्रिस नायकवडी, आ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील, माजी आमदार प्रकाश आवाडे, कर्नाटकचे माजी आमदार के. पी. मेगन्‍नवर, लक्ष्मण माने, राजन साळवी, राजेश पाटील, जयश्री मदन पाटील, बाळासाहेब देशमुख, डी. सी. पाटील, मयूर उद्योग समूहाचे संजय पाटील, इंद्रजित मोहिते, धैर्यशील देसाई, रोहित पाटील (सांगली), गणपतराव पाटील, विजयादेवी यादव, विद्याताई पोळ, सुरेश भोसले, राजाराम पानगव्हाणे यांनी पाटील कुटुंबीयांचे सांत्वन केले.

रक्षाविसर्जनावेळी भावनिक वातावरण

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या रक्षाविसर्जनावेळी गुरुवारी भावनिक वातावरण होते. रक्षाविसर्जनासाठी सकाळपासूनच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यांच्या आठवणींना उजाळा देताना अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते. रक्षाविसर्जन अत्यंत शिस्तबद्ध आणि भावपूर्ण वातावरणात पार पडले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news