

कोल्हापूर : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीस थोडा विलंब झाला असला, तरी सर्व कामे महापालिकेकडून गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करून पूर्वीप्रमाणेच या नाट्यगृहाची भव्य उभारणी होईल, असा विश्वास उद्योगमंत्री मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. कोल्हापूर शहरातील नाट्य क्षेत्रातील रंगकर्मींसमवेत संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या कामाची त्यांनी पाहणी केली.
मंत्री सामंत म्हणाले, हेरिटेज समिती तसेच नाट्य क्षेत्रातील अनुभवी तसेच नाट्य मंडळाच्या सूचनांचा समावेश नाट्यगृहाच्या उभारणीत करावा. व्यावसायिक रंगभूमीच्या निर्मात्यांना नाट्यगृह स्वस्त दरात उपलब्ध व्हावे, वीज खर्च कमी व्हावा यासाठी सोलर संयंत्र बसवणे आवश्यक आहे. सोलर संयंत्रामुळे नाट्यगृहाचे भाडेदर कमी करून ते सामान्यांना परवडेल अशा दरात उपलब्ध करून देता येईल.
नाट्यगृहात इतर वेळी मराठी चित्रपट दाखवता यावेत, यासाठी पांढरा पडदा आणि प्रोजेक्टरची व्यवस्था करण्यात येणार आहे. नाट्यगृहाला बुकिंग नसेल, तेव्हा नाममात्र दरात शालेय विद्यार्थ्यांसह चित्रपटप्रेमींसाठी मराठी चित्रपट दाखवण्याची सुरुवात लवकरच करावी, अशा सूचना मंत्री सामंत यांनी केल्या.
यावेळी नाट्य क्षेत्रातील मिलिंद अष्टेकर, आनंद कुलकर्णी, सुनील घोरपडे, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शहर अभियंता रमेश मस्कर, सहायक अभियंता सुरेश पाटील, मिलिंद पाटील, नाट्यगृह व्यवस्थापक समीर महाब्री उपस्थित होते.