मुंबई : ‘ईडी’च्या ‘रडार’वर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापुरातील नेते, विद्यमान मंत्री हसन मुश्रीफ यांना मोठा दिलासा मिळाला. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यातील कथित 40 कोटी रुपयांच्या आर्थिक अफरातफर प्रकरणात मुरगूड पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात पोलिसांनी सी-समरी अहवाल (क्लोजर रिपोर्ट) दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. याची दखल घेत न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठाने मुश्रीफ यांची गुन्हा रद्द करण्यासाठी दाखल केलेली याचिका निकाली काढली.
संताजी घोरपडे साखर कारखान्यातील कथित 40 कोटी रुपयांच्या आर्थिक अफरातफर प्रकरणात मुरगूड पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याशी संबंधित मुश्रीफ यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळताना अटकेपासून केवळ तीन दिवसांचे संरक्षण दिले. या पार्श्वभूमीवर मुश्रीफ यांच्या वतीने अॅड. प्रशांत पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने 10 मार्च 2023 रोजी पुढील आदेशापर्यंत ते कायम ठेवले होते; तर ‘ईडी’ने दाखल केलेल्या गुन्ह्यातही हायकोर्टाने अंतरिम संरक्षण दिले होते. ते आजतागायत कायम होते.
दरम्यान, मुश्रीफ यांनी हा गुन्हा रद्द करा, अशी विनंती करणारी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्यासमोर सुनावणी झाली, यावेळी सरकारी वकील आशिष सातपुते यांनी याप्रकरणी पोलिसांनी कागल न्यायालयात सी-समरी (क्लोजर रिपोर्ट) अहवाल सादर केला असल्याची माहिती न्यायालयाला दिली. याची दखल घेत खंडपीठाने मुश्रीफ यांची याचिका निकाली काढली. हा मुश्रीफांना दिलासा मानला जात आहे.