

कोल्हापूर : हद्दवाढीबाबत लोकप्रतिनिधीच आडवे पडतात, काय करायचे? कोल्हापूर शहरालगत असलेल्या गावांचा तरी समावेश करून तातडीने हद्दवाढ व्हावी, अशी आपली भूमिका आजही कायम आहे. हद्दवाढीबाबत शहराचे आमदार राजेश क्षीरसागर यांना घेऊन शासनाकडे पुन्हा प्रयत्न करू, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
कोल्हापूरची हद्दवाढ होत नाही ही आमची खंत आहे. जी गावे शहरालगत आहेत, त्यांना घेऊन पहिल्या टप्प्यात हद्दवाढ व्हावी, अशी आपली भूमिका आहे. आजही ती कायम आहे. राज्याचे नगरविकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत पुन्हा एकदा भेटू, असेही त्यांनी सांगितले. मुश्रीफ म्हणाले, सीपीआरमधील अतिक्रमणे काढली आहेत. जी काही शिल्लक आहे त्याची माहिती घेऊ. वैद्यकीय शिक्षण विभागाची जी पदे लोकसेवा आयोगामार्फत भरली जातात, त्या पदांची जाहिरात दिली आहे. त्याची प्रक्रिया सुरू आहे. जी पदे जिल्हाधिकार्यांमार्फत भरायची आहेत, त्याबाबतही जाहिरात दिली आहे. त्याचीही प्रक्रिया सुरू आहे.
जरांगे यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे, त्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस योग्य मार्ग काढतील. भाजपला पक्ष फोडायची चटक लागली आहे, असे खा. संजय राऊत यांच्या वक्तव्यावर भाजपसोबत आमचा अनुभव चांगला आहे, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.