कोल्हापूर : पिसाळलेल्या कुत्र्याला फार दगड मारायचे नसतात, तो अंगावर येतो. त्याचा योग्य पद्धतीने बंदोबस्त करायचा असतो, अशा शब्दांत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर टीका केली. हाके यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली होती. त्यावर जिल्हाधिकारी कार्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते.
ठाकरे बंधूंच्या शनिवारी होणार्या मेळाव्याबाबत बोलताना मुश्रीफ म्हणाले, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी यापूर्वीच आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. हे एका कुटुंबातील दोन भाऊ एकत्र येणार असतील, तर त्यांना सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. राजकारणात काय बदल होतात, हे नंतर निवडणुकीत जनता ठरवेल. राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबाबत शरद पवार यांच्या वक्तव्याविषयी विचारता ते म्हणाले, ठाकरे बंधूंप्रमाणेच शरद पवारांनीही एकत्र यावे, यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, शरद पवार यांनी भाजपसोबत गेलेल्यांसोबत आम्ही जाणार नाही, असे सांगितले आहे, असे सांगत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबतची शक्यता फेटाळली.
नवीन दहा एमबीबीएस कॉलेजना केंद्राने परवानगी दिली आहे. त्यामध्ये असलेल्या त्रुटींबाबत नोटीस आली होती. त्याला उत्तर दिले आहे. पायाभूत सुविधा आणि कर्मचारी याबाबतचे मुद्दे होते. जागा कमी करण्याचा मुद्दा नाही. वैद्यकीय महाविद्यालयातील कुठलीही जागा कमी केलेली नाही.