

कोल्हापूर : महिलांना आर्थिकद़ृष्ट्या सक्षम व स्वावलंबी बनवण्यासाठी राज्यात यावर्षी 10 हजार पिंक ई-रिक्षांचे वितरण करण्यात येणार आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी जीपीएस प्रणाली व प्रवाशांचे छायाचित्र घेण्याची सोय असलेल्या या रिक्षा महिलांना रोजगारासोबत सन्मानाची संधी देतील, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले.
महिला व बालविकास विभागाच्या वतीने महासैनिक दरबार हॉल येथे पिंक ई-रिक्षा व रूपे कार्ड वितरण त्यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, तर पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार शाहू महाराज, माजी आमदार राजेश पाटील, महिला व बालविकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे, जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. आदी उपस्थित होते. पालकमंत्री आबिटकर म्हणाले, महिलांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी महिला व बालविकास विभागाच्या योजना अधिक प्रभावीपणे राबविल्या जातील. महिलांना आर्थिकद़ृष्ट्या सक्षम करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतील तीन टक्के निधीतून उद्योगनिर्मितीला चालना दिली जाईल.
खासदार शाहू महाराज यांनी प्रदूषणमुक्त रिक्षांना जिल्ह्यात उत्तम प्रतिसाद मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. आयुक्त नयना गुंडे यांनी योजनेंतर्गत रिक्षा किमतीच्या 70 टक्के रक्कम खासगी बँकांकडून कर्ज स्वरूपात, तर 20 टक्के राज्य शासन देणार असल्याची माहिती दिली.
गेल्या वर्षी रक्षाबंधनाच्या निमित्ताने माझी लाडकी बहीण ही योजना सुरू झाली. यंदा पिंक ई-रिक्षाचे हँडल महिलांच्या हाती सोपवले. महिलांना सक्षम करण्यासाठी यापुढेही योजना सुरू राहतील. कोणतीच योजना बंद होणार नाही. भविष्यात महिलांनी महायुतीच्या उमेदवारांना निवडून दिले, तर लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ, असे म्हणत रक्षाबंधनाची अनोखी ओवाळणी दिली आहे, असे मुश्रीफ म्हणाले.
रिक्षाची किल्ली लाभार्थी महिलांच्या हाती सोपवल्यानंतर गुलाबी रंग आणि अत्यंत आकर्षक रूपातील पिंक ई-रिक्षात बसून सर्व मंत्री तटकरे, आबिटकर, मुश्रीफ, खासदार शाहू महाराज यांच्यासह नेते, अधिकारी यांनी फेरफटका मारला.