

आशिष शिंदे
कोल्हापूर : कोल्हापुरात येणार्या आठवड्यापासून हिवाळ्याची चाहूल अधिक तीव्र होणार आहे. उत्तर भारतात 4 नोव्हेंबरपासून सक्रिय झालेल्या तीव्र ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’नंतर येणार्या थंड उत्तरेकडील वार्यांचा प्रभाव 5 नोव्हेंबरपासून मध्य भारतात पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. या थंड हवेच्या लाटेचा प्रत्यक्ष परिणाम कोल्हापुरात 7 ते 8 नोव्हेंबरपासून जाणवू लागणार असून, किमान तापमानात लक्षणीय घसरण होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. हिवाळ्याच्या पहिल्या कूल स्नॅपमुळे येणार्या आठवड्यात कोल्हापुरात वातावरण ‘ठंडा ठंडा, कूल कूल’ राहणार आहे.
जिल्ह्यात शुक्रवारपासूनच सकाळी गारवा वाढू लागेल. सध्याचा किमान तापमानाचा स्तर 20 अंशांच्या आसपास असला, तरी 8 नोव्हेंबरपासून ते आणखी खाली येण्याचा अंदाज आहे. ग्रामीण भागात आणि शाहूवाडी, पन्हाळा, गगनबावडा, राधानगरीसारख्या पट्ट्यात तापमान आणखी घसरण्याची शक्यता आहे. हा थंडीचा जोर सुमारे आठवडाभर टिकण्याची शक्यता असून, सकाळी आणि रात्री अचानक वाढणार्या गारव्यामुळे नागरिकांनी आरोग्याची खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
दिवसभर ढगाळ वातावरण व सायंकाळनंतर हवेत गारवा असे वातावरण गुरुवारी पाहायला मिळाले. गेल्या 24 तासांत वातावरणात सौम्य बदल झाला असून कमाल तापमान 28.6 अंश तर किमान तापमान 20.2 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. सकाळी हलका गारवा जाणवत असला, तरी दुपारनंतर थोडी उष्णता होती. रात्री पुन्हा हवेत गारवा निर्माण झाला होता.
हिवाळ्याच्या आगमनाची पहिली चाहूल
कोल्हापुरात कूल स्नॅप म्हणजेच अचानक आलेल्या थंडीची लाट जाणवण्यास सुरुवात झाली आहे. उत्तर भारतातून येणार्या थंड वार्याचा प्रवाह दक्षिणेकडे सरकल्याने तापमानात झपाट्याने घसरण होऊ लागली असून हवेतली आर्द्रता कमी होत आहे. परिणामी, सकाळी व संध्याकाळी गारव्याची तीव्रता जाणवत आहे. साधारणपणे 3 ते 7 दिवस टिकणारी ही क्षणिक थंडीची लाट हिवाळ्याच्या आगमनाची पहिली चाहूल असल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले.