कोल्हापूर : अमूल दूध संघाच्या वाढीसाठी गोकुळ मोडीत काढण्याचा डाव सुरू आहे. भाजपकडूनच हे षड्यंत्र सुरू असल्याचा गंभीर आरोप दूध संस्था प्रतिनिधींनी गुरुवारी केला. सहायक निबंधक दुग्ध कार्यालयात सुनावणीसाठी निबंधक उपस्थित नव्हते, त्यामुळे आक्रमक झालेल्या प्रतिनिधी कार्यालयात निदर्शने करत शासनाचा निषेध केला.
जिल्ह्यात अमूल दूध संघ गेल्या पाच वर्षांपासून पाळेमुळे पसरविण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र त्यांना यश मिळालेले नाही. त्यामुळे गोकुळचा पाया असणार्या दूध संस्थांवर घाव घातला जात आहे. गोकुळला अनेक वर्षे दूध पुरवठा सुरू असताना यापूर्वी मतदान केले असताना संस्थांची अवसायन प्रक्रिया सुरू करण्याचे कारण काय? या संस्था पाकिस्तानातील आहेत का? असा संतप्त सवाल यावेळी केला.
जिल्हा बँकेचे संचालक प्रताप माने म्हणाले, संस्था सुनावणीचे काम नियमित सुरू असताना अधिकारी अचानक गायब होणे संशयास्पद आहे. या संस्थांचे काम नियमित असताना कोणीही उठून त्या बेकायदेशीर आहेत म्हणणे चुकीचे आहे. जाणीवपूर्वक हा प्रकार सुरू आहे तो खपवून घेणार नाही. यावेळी विकास पाटील, दिनकर कोतेकर, विजयसिंह पाटील, संजय चितारी, प्रवीण भोसले, रवी पाटील, दत्ता पाटील आदी उपस्थित होते.
संस्था अवसायनात काढून गोकुळ मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा संशय आहे. यामागे असलेल्या अद़ृश्य शक्तीचा शोध घेऊन गोकुळमधून खड्यासारखे बाजूला करू, असा इशारा संस्थांनी दिला.