

सुनील कदम
कोल्हापूर : संपूर्ण देशात दररोज ३० कोटी लिटर दुधाचे उत्पादन होते. यातील धक्कादायक विरोधाभास म्हणजे रोज होणारी दुधाची विक्री तब्बल ७० कोटी लिटर आहे. म्हणजेच हे जादाचे ४० कोटी लिटर दूध कुठून येते हा गंभीर प्रश्न आहे. ही सगळी किमया आहे दुधातील भेसळीची आणि बनावट दुधाची! दुधातील या भेसळीमुळे नागरिकांचे आरोग्य दिवसेंदिवस नासत चालले आहे.
देशात गोवंशी जनावरांची संख्या १९ कोटी ३० लाख, तर म्हैसवर्गीय जनावरांची संख्या ११ कोटी आहे. त्यापैकी दुधाळ गायी-म्हशींची संख्या १२ ते १३ कोटी इतकी आहे. त्यातील भाकड आणि आटलेल्या दुधाळ जनावरांची संख्या विचारात घेतली, तर केवळ ६ ते ७ कोटी गायी-म्हशी दूध देतात. देशातील सर्व प्रकारच्या गायी-म्हशींची दैनंदिन सरासरी दूध उत्पादन क्षमता ५ ते ६ लिटर इतकीच आहे. म्हणजे देशात प्रतिदिन सरासरी ३० ते ३५ कोटी लिटर एवढेच दूध उत्पादन होते. असे असताना देशांतर्गत दुधाची दररोजची विक्री ही ७० कोटी लिटरच्या घरात आहे, म्हणजे उत्पादनापेक्षा विक्री जवळपास दुप्पट!
ही भेसळीची किमया!
दुधाच्या उत्पादनापेक्षा दुप्पट विक्री होण्याची ही जादू चालते भेसळीच्या दुधावर! आजकाल बाजारात कुठेही शुद्ध आणि नैसर्गिक दूध मिळणे जवळजवळ संपुष्टात आले आहे. दुधाचा अगदी घरगुती रतीब लावला तरी त्यात किमान काही प्रमाणात हमखास पाणी मिसळलेले आढळून येते. ही पाण्याची भेसळ एकवेळ परवडली; पण दुधात जी अन्य जीवघेणी भेसळ केली जाते ती भयानक आहे. पाण्याची भेसळ केलेले दूध जर दूध संस्थेला पुरविले जाणार असेल तर भेसळ उघड होण्याचा धोका असतो. त्यामुळे तपासणीवेळी दुधातील स्निग्धांश आणि ‘एसएनएफ’ जादा दिसण्यासाठी दुधात साखर आणि युरियासारखे घातक पदार्थ मिसळले जातात. अनेकवेळा दूध उत्पादकांकडून आज स्वीकारलेले दूध बहुतांश संस्थांकडून सगळी प्रक्रिया पूर्ण करून साधारणत: दुसऱ्या दिवशी शहरांकडे पाठविले जाते. या दरम्यानच्या कालावधीत दूध खराब होऊ नये म्हणून त्यात चक्क कपडे धुण्याचा सोडा घातला जातो. हा सोडा मानवी आतडी पार खंगाळून काढल्याशिवाय राहील काय? त्याचप्रमाणे पावडरचे दूधही धारोष्ण दूध म्हणून ग्राहकांच्या गळ्यात मारले जाताना दिसते. विशेष म्हणजे, आजकाल लोकांना जडत असलेले बहुतांश आजार दुधातील या भेसळीमुळे होत आहेत.
बनावट दुधाचा महापूर!
उत्तर प्रदेश आणि बिहारसह काही राज्यांमध्ये तर चक्क बनावट दूध तयार करण्याचा फसवणुकीचा धंदा खुलेआम चालतो. आंंघोळीला वापरला जाणारा शाम्पू, गोडेतेल, साखर आणि पाणी यांच्या मिश्रणातून असे बनावट दूध तयार केले जाते. ज्या भागात पिण्याच्या पाण्याची वानवा आहे, त्या भागातून बनावट दुधाचे टँकरच्या टँकर शहरांकडे धावताना दिसताहेत. महाराष्ट्रातील प्रामुख्याने महानगरी भागात अशा बनावट दुधाचा रतीब गेल्या कित्येक वर्षांपासून घातलेला दिसतो आहे.